लांजा शहरातील कचर्याचे सत्ताधारी शिवसेना व नगर पंचायत प्रशासनासमोर आव्हान
लांजा नगर पंचायतीच्या बुधवारी झालेल्या सभेत कचरा प्रश्नावर जोरदार चर्चा करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षांनी प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात कचरा टाकण्यासाठी व्यवस्था करावी, असे सांगितले. लांजा नगर पंचायतीकडे कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत नगरपंचायतीने धुंदरे येथे भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत कचरा टाकण्यास धुंदरे येथील स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. यापुढे या जागेत कचरा टाकला जाऊ नये, अशी भूमिका येथील नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे लांजा नगरपंचायत आणि पर्यायाने सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासन यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. धुंदरे येथील लोकांनी विरोध केल्यानंतर नगरपंचायतीने वांजूदेवी या ठिकाणी दुसरी जागा कचरा टाकण्यासाठी शोधली होती. मात्र या जागेला देखील तेथील नागरिकांनी विरोध केल्याने आता जागेची शोधाशोध करण्याची वेळ आली आहे.