केंद्राकडून महाराष्ट्राचे तब्बल पन्नास हजार कोटी थकित : खा. विनायक राऊत
देवरूख : महागाई प्रचंड वाढली आहे. मात्र केंद्र सरकारला गरिबांबद्दल काहीही पडलेलं नाही. देशाचे नेतृत्व करणार्यांनी संपूर्ण देशाचे हित जोपासले पाहिजे. मात्र केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारबाबत दुजाभाव करीत आहे. टॅक्सच्या रुपात राज्य सरकारला केंद्राकडून देय असलेली रक्कम दिली जात नाही. तब्बल पन्नास हजार कोटी महाराष्ट्राचे पेंडिंग आहेत. मात्र त्याबद्दल संसदेत आवाज उठवला तर सत्ताधारी काहीच बोलत नाहीत, अशी टीका रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर केली. देवरूख येथे बुधवारी आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या उपनेत्या मीना कांबळी, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा संघटक वेदा फडके आदींसह महिला उपस्थित होत्या.