
हातखंबा येथे साखरेचा ट्रक घरावर धडकल्याने चौघे जखमी
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर साखर घेऊन चाललेला ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने घरावर धडकला. हातखंबा गावात वळणावर मंगळवारी रात्री हा अपघात झाला. त्यात ट्रकमधील चौघे प्रवासी जखमी झाले. त्यातील एक जण गंभीर आहे. याबाबत अधिक माहितीनुसार ट्रक क्र. एम.एच.08-एस-2350 हा सांगलीतील वाळवा येथून साखरेची पोती घेऊन जयगडला चालला होता. रात्री नऊच्या सुमारास तो मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गाव येथे आला. येथील पुलाजवळील पहिल्याच वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने तो थेट तेथील श्री भुते यांच्या घरावर आदळला. त्यात शुभांगी अभिमन्यू घुगरे (वय 55), नितेश अभिमन्यू घुगरे (वय 30), सागर कलू पाटील (वय 33) तसेच सुप्रिया सागर पाटील (वय 29, सर्व रा. मुंबई नालासोपारा) हे चौघे जखमी आहेत. या घटनेतील चालकाचे नाव सतीश कृष्णदेव पाटील (वय 32) राहणार ता. शिराळा, जि. सांगली असे आहे. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची हातखंबा येथील रुग्णवाहिका तातडीने अपघातस्थळी पोहोचली. त्यातून सर्व जखमींना रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील शुभांगी घुगरे यांची प्रकृती गंभीर आहे. या सर्व जखमींसाठी ही रुग्णवाहिका अतिशय उपयुक्त ठरली. त्यातून तातडीने रुग्ण दवाखान्यात दाखल झाले व त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली. या अपघातात धडक दिलेल्या घराचे व ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.