‘लोटिस्मा’च्या कार्याध्यक्षपदी धनंजय चितळे यांची निवड

चिपळूण : येथील एकशे अठ्ठावन्न वर्षांची परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कार्याध्यक्ष पदी विद्यमान कार्यवाह, प्रसिद्ध प्रवचनकार आणि लेखक धनंजय चितळे यांची निवड झाली आहे. तसेच कार्यवाहपदी विनायक ओक, कोषाध्यक्षपदी श्रीराम दांडेकर यांची निवड झाली आहे. वाचनालयाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवीन निवडीबद्दल सर्व संचालक मंडळाने त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या सहकार्याने ‘लोटिस्मा’ प्रगतीकडे झेप घेईल असा विश्वास अध्यक्ष डॉ. यतिन जाधव यांनी व्यक्त केला आहे.

धनंजय चितळे हे संत साहित्याचे तरुण पिढीतील गाढे अभ्यासक आहेत ते आपल्या रसाळ शैलीत श्रीगणपती अथवशिर्षाची महती विशद करतात.त्यांनी गेली २१ वर्षे कोकणसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, हैद्राबाद, ग्वाल्हेर आदि ठिकाणी २३०० हून अधिक प्रवचने दिली आहेत. वाचनालयाशी ते गेली दोन हून अधिक दशके निगडीत आहेत. ते परशुराम एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्थ आहेत. ग्रंथालय चळवळीतील योगदानाबद्दल त्यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कै. वासंती गाडगीळ आणि श्रीपाद सेवा मंडळ पुणे तर्फे संत साहित्य अभ्यासक या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

वाचनालयाच्या कार्यकारणीत उपाध्यक्ष : सुनील खेडेकर, राष्ट्रपाल सावंत, सहकार्यवाह : प्रकाश घायाळकर, संचालकांमध्ये मधुसूदन केतकर, धीरज वाटेकर, अभिजित देशमाने, अंजली बर्वे, वसुंधरा पाटील, मनीषा दामले, दिशा रावराणे कार्यरत आहेत. मागील तीन तपांहून अधिक काळ वाचनालयाच्या जडणघडणीत आपले मौलिक योगदान दिलेल्या प्रकाश देशपांडे यांनी ‘वयाच्या पंचाहत्तरीनंतर कोणत्या सक्रीय पदावर कार्यरत राहायचे नाही’ या उक्तीनुसार कृती करत हा निर्णय घेतला आहे. पुढील काळात देशपांडे यांनी वाचनालय परिवारास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.

फोटो ०१ : ‘लोटिस्मा’च्या कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर धनंजय चितळे यांचे स्वागत करताना अध्यक्ष डॉ यतिन जाधव, प्रकाश देशपांडे, अरुण इंगवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button