जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकपदी अजय चव्हाण
रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारी संचालकपदी अजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून, श्री. चव्हाण यांनी बुधवारी १३ रोजी कार्यकारी संचालक पदाचा पदभार स्वीकारला.
यापूर्वीचे कार्यकारी संचालक सुनील गुरव हे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी अजय चव्हाण यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार श्री. चव्हाण यांनी बुधवारपासून कार्यकारी संचालक पदाचा पदभार स्वीकारला.
अजय चव्हाण हे १६ जुलै १९९० असिस्टंट इन्स्पेक्टर म्हणून जिल्हा बँकेत रुजू झाले. सिनियर इन्स्पेक्टर, तालुका इन्स्पेक्टर, अधीक्षक, सहाय्यक सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक, सरव्यवस्थापक आदी पदावर त्यांनी काम केले. दि. १ नोव्हेंबर २०१८ पासून श्री. चव्हाण हे सरव्यवस्थापक पदावर काम करत होते. बुधवार १३ मार्चपासून त्यांनी कार्यकारी संचालक म्हणून कामकाजाला सुरुवात केली आहे.
१९९० पासून बँकेच्या सेवेत रुजू झाल्यानंतर श्री. चव्हाण यांनी विविध पदावर काम करताना अत्यंत प्रामाणिकपणे काम करत बँकेला प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल संचालक मंडळाने घेत आणि विशेषतः जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी श्री. चव्हाण यांच्यावर कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी सोपवली आहे. संचालक मंडळ तसेच अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र राहत बँकेला प्रगतीपथावर नेण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी ग्वाही नूतन कार्यकारी संचालक अजय चव्हाण यांनी दिली.
आज पदभार स्वीकारल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या.