
यंदाच्या पाडव्यादरम्यान केवळ 20 हजार पेट्याच मुंबईला रवाना
रत्नागिरी : गुढीपाडव्यानंतर वाशीतील पेटींची संख्या लाखाच्या दरम्यान पोहोचते. यावर्षी वाशीमध्ये सध्या 20 हजार पेटीच कोकणातून जात आहे. त्यामुळे पाच डझनच्या पेटीचा दर 5 हजार रुपयांपर्यंत आहे. मुंबईतील वाशीसारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये वीस हजार पेटीच हापूस जात आहे. त्यामुळे हापूसचे दर चढेच आहेत. 25 एप्रिलनंतरच मुबलक हापूस बाजारात दाखल होणार असल्याने सर्वसामान्यांना अजूनही चव आंबटच आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस, ढगाळ वातावरण अशी स्थिती गेले आठ दिवसात होती. याबरोबरच उष्णतेची लाटही कायम आहे. कडकडीत उन्हाचा परिणाम हापूसवर दिसून येतो. आंबा बाहेरून भाजल्याने त्यात साका होऊ शकतो. पावसामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात बाजारपेठेतील आवक कमी असल्याने दर मात्र स्थिरावलेले आहेत.