आता महावितरणच्या ग्राहकांना प्रति युनिट १० पैसे ते २५ पैसे जादा मोजावे लागणार
वीजनिर्मितीसाठी वापरला जाणारा कोळसा महागल्याने वाढीव खर्च इंधन समायोजन आकाराच्या माध्यमातून वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे महावितरणच्या ग्राहकांना प्रति युनिट १० पैसे ते २५ पैसे जादा मोजावे लागणार असल्याने १०० युनिटपर्यंत १० रुपये, तर ३०० युनिटपर्यंत ६० रुपयांचा अतिरिक्त बोजा त्यांच्यावर पडणार आहे.राज्य वीज नियामक आयोग बहुवार्षिक वीजदर ठरवताना वीजखरेदीचा सरासरी खर्च लक्षात घेऊन वीजदर निश्चित करत असते. त्यानुसार आताचे वीजदर मार्च २०२० मध्ये जाहीर झाले. त्यावेळी इंधनखर्चात होणारी वार्षिक वाढ लक्षात घेऊन डिसेंबर २०२१ पर्यंत इंधन समायोजन आकार म्हणजेच इंधनावरील वाढीव खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी लागू केला जाणारा आकार वीजग्राहकांना आकारला जाणार नाही, अशारितीने रचना करण्यात आली होती.दरम्यानच्या काळात कोळशाचे दर वाढले आणि आता डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात वीजखरेदीवरील वाढीव खर्च वसूल करण्यासाठी मार्च ते मे २०२२ या काळातील वीजवापरावर महावितरणच्या वीजग्राहकांवर इंधन समायोजन आकार लागू केला जाणार आहे. मार्चमधील वापराची वीजदेयके आता एप्रिलमध्ये येतील़ त्यामुळे या महिन्यापासून जूनपर्यंत हा इंधन समायोजन आकार लावण्यात येणार आहे.
www.konkantoday.com