कोकणच्या प्रश्नांवर सर्वसमावेशक पुस्तक- श्रीपाद नाईक


रत्नागिरी/- कोंकणाच्या वेगवेगळ्या प्रश्नांचा विस्तृत ऊहापोह करणारे ‘अपरांन्त’००) हे पुस्तक केंद्रीय पर्यटन, बंदर व जलवाहतूक मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते प्रकाशित झाले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि रत्नागिरी मतदारसंघाचे विधानसभा प्रतिनिधी उदय सामंत या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर उद्योजक दीपक गद्रे, लेखक अॅड. विलास पाटणे, शहर वाचनालयाच्या अध्यक्षा मोहिनी पटवर्धन आणि माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची उपस्थिती होती.
     या प्रकाशन सोहळ्याचा प्रारंभ लेखक विलास पाटणे यांच्या भाषणाने झाला. कोंकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ, मासे मिळतात त्या कोंकण प्रदेशातच मत्स्य विद्यापीठ असण्याची गरज, जल पर्यटनासाठी छोट्या नौकांना अर्थसहाय्य देण्याची आवश्यकता अशा मुद्द्यांना स्पर्श करत त्यांनी अत्यंत परखड पण संयत शब्दांत कोंकणाच्या कागदावर राहिलेल्या विकासाचा समाचार घेतला. जो ‘कॅलिफोर्निया’ कोंकणाचे उद्दिष्ट ठेवले त्या प्रदेशात एकोणीस रिफायनरी आहेत आणि कोंकणात त्याच प्रकल्पांना विरोध केला जातो हा विरोधाभास त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडला.
     अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केल्याने प्रगत आणि स्वावलंबी झालेल्या जपान आणि तैवान या लहानशा देशांनी जगाला आपले सामर्थ्य दाखवून देणाऱ्या लहान देशांचे उदाहरण देत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या भाषणाची सुरुवात झाली. आपला विकास आपणच करणार आहोत हे आत्मविश्वास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शिक्षण झाल्यावर काही काळ प्रत्येकाने आपल्या गांवात काम करण्याची गरज त्यांनी सुचविली. स्वस्त विजेचा अखंड पुरवठा हे जगातील प्रगत राष्ट्रांच्या समृद्धीचे गमक असल्याचे ते म्हणाले, आणि ही गोष्ट अणुविद्युत निर्मितीने साध्य होईल असे ते म्हणाले.
    स्थानिक माणसे उपलब्ध नसल्यामुळे दूरच्या प्रदेशांतून येणाऱ्या कामगारांपैकी पुष्कळजण ड्रग्जचा चोरटा व्यापार, दहशतवाद, नक्षलवाद यांसारख्या गुन्हेगारी कामाशी संबंधित असतात, समुद्रकिनारी प्रदेशाचा वापर देशविघातक कृत्यांसाठी केला जातो. यासाठी संपूर्ण महामार्गावर छुपे कॅमेरे बसविण्यात यावे असे दीक्षित म्हणाले.
    ‘कोंकणाच्या दृष्टीने काही अपेक्षा व्यक्त करण्याचा कार्यक्रम’ अशा शब्दांत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपले भाषण सुरू केले. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारी रिफायनरी बारसू येथे होणार असेल तर लोकहिताचा विचार करता तिला विरोध नाही असे त्यांनी स्पष्ट केले. कोयना अवजलाचा कोंकणासाठी वापर करण्यासाठी राबवाव्याच्या योजनेसाठी राज्य आणि केंद्रा सरकारांनी एकत्र आले पाहिजे, त्याकरिता पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी श्रीपाद नाईक यांनी केले. कोंकणाच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे ते म्हणाले. कोंकणातून उच्च पदावरील प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी निर्माण व्हावे याकरिता मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या मार्गदर्शन उपक्रमासाठी पंचवीस लाख रुपये निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरीचे दानशूर सुपुत्र श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करण्याचे कार्य या उपकेंद्रात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
     ‘कोंकणाचा इतिहास ते आजच्या समस्या यांचा समग्र आढावा घेणारे सर्वसमावेशक पुस्तक’ असे वर्णन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. पुस्तकातील विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेखांचा त्यांनी थोडक्यात परामर्ष घेतला. कोकणाच्या समस्या मांडताना लेखकाच्या भाषेत कोठेही आक्रस्ताळेपणा दिसत नाही हे त्यांनी अधोरेखित केले. विकासाची गती वाढली पाहिजे, कोंकणातून लवकर प्रस्ताव आले पाहिजेत असे ते म्हणाले.
     ‘लोकमान्य मार्टिपर्पज सोसायटीच्या विभागीय व्यवस्थापक लक्ष्मीकांत खेडेकर यांनी राज्यातील सर्व आमदारांना देण्यासाठी मंत्री श्री. सामंत यांना प्रतीकात्मक म्हणून या पुस्तकाची प्रत भेट दिली. राज्याचे माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी कार्यक्रमाला मुंबईहून शुभेच्छा दिल्या.
     या समारंभाचे सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केले. मोहिनी पटवर्धन यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button