कोळंबेचा धावपटू अक्षय पडवळची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
संगमेश्वर : तालुक्यातील कोळंबेसारख्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या अक्षय पडवळ या तरुणाने मुंबई ते गोवा हे 567 किलोमीटरचे अंतर 8 मित्रांच्या सहकार्याने 40 तास 14 मिनिटांत पूर्ण केले आहे. त्याच्या या रेकॉर्डची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. अक्षयच्या या रेकॉर्डच्या नोंदीने संगमेश्वरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अक्षय पडवळ याचे कोळंबे येथे 2016 ला 12 वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे तो मुंबईमध्ये नोकरीसाठी गेला. तिथे त्याला लॅब असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली. यामध्ये तो समाधानी नव्हता. काहीतरी नवीन करण्याची इच्छा त्याच्या मनात सतत येत होती. इच्छा असेल तर मार्ग दिसेल असेच काहीसे झाले. 2018 मध्ये त्याला जीममध्ये भूषण नावाचा मित्र भेटला. त्याच्यासोबत तो धावण्याचा सराव करत होता. नोकरी सांभाळून प्रॅक्टीस करणे त्याला अवघड जात होते. शेवटी त्याने नोकरी सोडली आणि अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धावण्याची प्रॅक्टीस सुरू केली. 16 जून 2018 मध्ये मुंबई येथे झालेल्या पहिल्या इव्हेंटमध्ये 25 किलोमीटर अंतर 2 तासात पूर्ण केले. येथूनच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
त्यानंतर त्याने लगेचच 2 सप्टेंबर 2018 रोजी ठाणे येथे झालेल्या दुसर्या 21 किमी हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. हे अंतर त्याने 1 तास 24 मि. 11 सेकंदामध्ये पूर्ण केले. अशा त्याने 10 हाफ मॅरेथॉनमध्ये 25 किमीच्या 2 , 10 किलोमीटरच्या 7 व 5 किलोमीटरच्या 6 एकूण 15 मॅरेथॉन स्पर्धांमध्ये यश संपादन केले. त्यानंतर खरी स्पर्धा झाली ती मुंबई ते गोवा मॅरेथॉन स्पर्धा. या स्पर्धेत अतिशय नियोजनबध्द पध्दतीने मित्रांच्या सहाय्याने किलोमीटरची आखणी केली. प्रत्येकाच्या वाट्याला 71 किलोमीटर अंतर येणार होते. हे अंतर 40 तास 14 मिनिटात पूर्ण केले. याबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.
रनर अपमध्ये उज्ज्वल करिअर याने निर्माण केले आहे. गेली 4 वर्षे मॅरेथॉन स्पर्धांमधून धावपटू म्हणून यश मिळवणार्या या कोकणच्या पट्ट्याने मुंबई, पुणे, गोवा यांसारख्या मोठ्या शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत अक्षयने आतापर्यंत 18 सुवर्ण व रौप्य पदके पटकावली आहेत. त्याच्या या गुणांची दखल आर्मी भरतीचे कोच अनिल कोरवी यांनी घेतली. त्यांनी आपल्या रन हॉलिक्स अॅकॅडमी, ठाणेमध्ये त्याला आर्मी भरती ट्रेनरची जबाबदारी सोपवली आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली 30 ते 40 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.