आसगे येथील राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेत देवळेतील आदित्य शिर्के, पाटगावच्या सुनील गोपाळ यांच्या बैलजोड्या प्रथम
लांजा : आसगे पंचक्रोशी मंडळ आसगे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय
बैलगाडा स्पर्धेत जिल्ह्यासह परजिल्ह्यातील एकूण ६६ बैल जोड्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील खुल्या घाटी बैलजोडी स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील आदित्य शिर्के यांच्या बैलगाडीने तर खुल्या
गावठी बैलजोडी स्पर्धेत पाटगाव येथील सुनील गोपाळ यांच्या बैलजोडीने
प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेला हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी गर्दी केली होती. स्पर्धेचे उद्घाटन नायब तहसीलदार उज्वला केळुस्कर, गटविकास
अधिकारी संतोष म्हेत्रे, आसगे सरपंच अनुष्का गुरव, आसगे पंचक्रोशी शेतकरी
मंडळाचे अध्यक्ष अनिल देसाई आदी मान्यवरांच्या उपस्थित झाले. दुपारी दोन वाजता सुरुवात झालेली ही
स्पर्धा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु होती. घाटी बैलजोडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक किरण जाधव-कोसुंब, तृतीय क्रमांक रोशन किर्वे – बोंडये, चौथा- केशव सकपाळ – वारूळ-शाहुवाडी, पाचवा क्रमांक प्रशांत बेटकर- मेघी
यांच्या बैलजोडीने मिळवला. गावठी बैलजोडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक अमोल किंजळकर – गोळवली, तृतीय – मल्लू किंजळकर-गोळवली यांनी पटकावला. आसगे गाव मर्यादित स्पर्धेत रमेश पावस्कर, अब्बास पाटणकर, भाई मांडवकर यांच्या बैलजोडीने अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी स्पर्धकांना मंडळाच्यावतीने रोख रक्कम व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेदरम्यान बैलांना इजा पोहोचणार नाही यासाठी शासकीय नियमावलीनुसार ही स्पर्धा पार पडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अनिल देसाई, सचिव प्रभाकर टोळे, उपाध्यक्ष द्वारकानाथ माने, खजिनदार विठोबा पांचाळ,
अल्लाउद्दीन नेवरेकर आदींसह मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.