सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत शिकारीसाठी फिरणार्‍या तिघांना अटक

देवरूख : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे (ता. संगमेश्‍वर) येथील क्षेत्रात घुसलेल्या तीन शिकारी तरुणांना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही वाघांच्या गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेर्‍यात दि. 31 मार्च रोजी दिसून आले आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही विनापरवाना शस्त्रासह गोठणे क्षेत्रात घुसले होते.
संगमेश्वर तालुक्यातील संदीप तुकाराम पवार (वय-37, रा. हातीव, गोठणे पुनर्वसन), मंगेश जनार्दन कामतेकर (वय-33, रा. मारळ) व अक्षय सुनील कामतेकर (वय-19, रा. मारळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
चांदोली वन्यजीव विभागाच्या तपास पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे. शुक्रवारी एकाला तर शनिवारी दोघा तरुणांना ताब्यात घेतले. याबाबतचा वनगुन्हा वनरक्षक रामदास दणाने यांनी तत्काळ जारी केला. वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांनी या घटनेबाबत कराडच्या विभागीय कार्यालयाला माहिती देऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, विभागीय वनअधिकारी, चांदोली राष्ट्रीय उद्यानचे विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू करण्यात आला.
विभागीय कार्यालयातून सहायक वनसंरक्षक गणेश पाटोळे व फिरत्या पथकाचे शिशूपाल पवार यांना तपासासाठी पाठवले होते. चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तपासाच्या चौकशीअंती संशयितांनी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात विनापरवाना शिकारीच्या उद्देशाने प्रवेश केल्याचे मान्य केले. दि. 2 रोजी मारळ येथील दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे. यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, विभागीय वनअधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या तपास पथकातील सहायक वनसंरक्षक गणेश पाटोळे, चांदोली वन्यजीवचे वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे, फिरत्या पथकाचे शिशूपाल पवार, वनपाल श्री. गारदी, वनरक्षक श्री. दणाने, वाहनचालक सचिन, अनंत, सागर तसेच वन्यजीवप्रेमी प्रतिक मोरे यांनी केली. या कारवाईसाठी रत्नागिरी वनविभागाचे विभागीय वनअधिकारी दीपक खाडे, वनक्षेत्रपाल प्रियांका लगड, देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला, वनरक्षक न्हानू गावडे व त्यांचे अधीनस्त कर्मचारी, पंचक्रोशीतील पोलिस पाटील व सरपंच यांची मदत लाभली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button