मुंबई-गोवा महामार्गाचे काम एका वर्षात पूर्ण करणार— केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अलिबाग,- कोकणातील रस्ते आणि बंदर विकासाच्या माध्यमातून कोकण समृद्ध आणि संपन्न होणार, त्यासाठी येथील बंदरे आणि त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची भूमिका महत्वाची आहे. या पार्श्वभूमीवर आगामी एका वर्षाच्या आत प्राधान्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी यांनी आज इंदापूर येथे केले.
रायगड जिल्ह्यातील 1036.15 कोटी किंमतीच्या 131.87 किलोमीटर लांबीच्या तीन महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण व 430 कोटी किंमतीच्या 42.30 किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पाचा भूमीपूजन सोहळा माणगाव-इंदापूर येथे श्री.नितीन गडकरी यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार भरत गोगावले,आमदार रवींद्र पाटील, माजी पालकमंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय चे मुख्य अभियंता तथा क्षेत्रीय अधिकारी श्री.राजीव सिंह, राज्य महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्गाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे, श्री.जे. एम.म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.गडकरी पुढे म्हणाले, कोकणाच्या विकासामध्ये अडचण राहणार नाही, सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार. पुढील वर्षभरात मुंबई गोवा महामार्गावरील काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
ते म्हणाले, कोकणातील गावांना जोडण्यासाठी मुंबईहून रोरो सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येईल तसेच वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पुणे ते जेएनपीटी रेल्वे मार्गाची गरज असल्याने त्याकडेही जातीने लक्ष देवू.
कोकणाला लाभलेल्या विस्तृत सागरी किनाऱ्यामुळे या भागात “ब्ल्यू इकॉनॉमी” ला प्रोत्साहन देऊन कोकणच्या विकासात मोठी वाढ होऊ शकेल. येथील कोळी बांधवांकरिता मासेमारीसाठी अत्याधुनिक ट्रॉलरची गरज असून त्यामुळे त्यांना १०० नॉटिकल पर्यंत मासेमारी करणे शक्य होईल, आणि त्यांचे उत्पन्नही वाढेल, असेही श्री.गडकरी म्हणाले.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम एकूण 11 टप्प्यांमध्ये (पॉकेटस) सुरु आहे. सुरुवातीच्या काळात भूमीसंपादन, रेल्वे विभाग आणि वनविभागाच्या आवश्यक परवानग्या यामुळे कामाला उशीर झाला. मुंबई-गोवा महामार्ग कोकणवासियांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे काम नक्कीच एक वर्षाच्या आत पूर्ण करु. हा महामार्ग आता केवळ मुंबई-गोवा नाही तर पुढे तो मंगलोरपर्यंत नेण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर शासकीय जमीन उपलब्ध झाली तर लॉजिस्टीक पार्क आणि ट्रक टर्मिनल उभे करण्यास सर्वतोपरी मदत करु, असेही गडकरी याप्रसंगी म्हणाले.
येथील युवकांच्या रोजगाराच्या संधीबद्दल बोलताना श्री.गडकरी म्हणाले, गेल्या सात वर्षात जेएनपीटीमध्ये एक लाख कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. जेएनपीटीमध्ये 2016 मध्ये 570 कोटी रुपये खर्च करुन विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ-special economy zone) सुरु करण्यात आले. त्यात आता 24 कंपन्या आलेल्या आहेत. या माध्यमातून 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक लवकरच येणार आहे. यामुळे कोकणातील दीड लाख युवकांना रोजगार मिळेल.
महाराष्ट्राला विशेषतः कोकणाला गड-किल्ल्यांचा मोठा वारसा लाभला आहे. त्यामुळे राज्यातील किल्ल्यासंदर्भात रोप-वेसाठी जेवढे प्रस्ताव येतील, ते सर्व तातडीने मंजूर करु, असे आश्वासन देवून श्री.नितीन गडकरी म्हणाले की, रोप-वे साठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे ऑस्ट्रीयन डॉफलवेअर तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याचा राज्यातील गडकिल्ले व तेथील परिसरासाठी वापर करता येईल. तसेच सर्व किल्ल्यांवर लाईड अँड साऊंड शो करावेत, जेणेकरून आजच्या पिढीला या गड-किल्ल्यांच्या शौर्याचा इतिहास माहीत व्हावा.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी गोवा महामार्गावरील ट्रक टर्मिनलची गरज यावेळी व्यक्त केली. रायगडमधील पूल देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानातूनच उभे राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. लोकहित समोर ठेवून नि:स्वार्थी व प्रामाणिकपणाने काम केल्यास त्या कामात निश्चित यश येते, ही शिकवण तसेच राजकारण विरहीत कामाची प्रेरणा आम्ही श्री.गडकरी यांच्याकडूनच घेतली असल्याचेही पालकमंत्री कु. तटकरे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
शेवटी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी कोकणासाठी रस्ते विकासाच्या माध्यमातून दिलेल्या भरीव योगदानाबद्दल जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री कु.तटकरे यांनी श्री.गडकरी यांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी खासदार सुनिल तटकरे यांनी वर्ष 2012 मध्ये सुरु झालेल्या आणि 2022 पर्यंत रखडलेल्या गोवा महामार्गाच्या या कामाला 450 कोटींचा विशेष निधी देऊन जी चालना दिली त्याबद्दल श्री. गडकरी यांचे आभार मानले. निजामपूर बायपास, माणगाव बायपास, पेडली बायपास यांची कामे सत्वर होण्याकरिता विभागाला सूचना देण्याची विनंती खा.तटकरे यांनी यावेळी केली. विरार-अलिबाग कॉरिडॉर आणि पेण अलिबाग महामार्गाचे काम देखील आपल्या विभागाच्या माध्यमातून गतिमान झाल्यास येथील पर्यटनात मोठी वाढ होईल, असेही ते म्हणाले. महाडमधील उभारलेल्या पूलांच्या बांधकामामुळे महाडमध्ये आलेल्या पूर समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्याचे तसेच पोलादपूरमध्ये महामार्गावर क्रॉसस्लॅब करुन देण्याचे खा.तटकरे यांनी यावेळी सूचित केले. जिल्ह्यातील पाच महामार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा दिला, त्याचप्रमाणे रेवस रेड्डी सागरी महामार्गास तो दर्जा देऊन केंद्राच्या माध्यमातून 50 टक्के निधी द्यावा, अशी विनंतीही त्यांनी श्री.गडकरी यांना केली.
आपल्या मनोगतातून खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संपूर्ण कारकिर्दीतील त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीची, महान कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तर उपस्थित मान्यवरांच्या स्वागतासाठी तळाशेत नवजीवन विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशमुख,संगीत शिक्षक श्री.भोपी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत गीत गायले. मान्यवरांचे पोलीस बँड पथकाने विशेष धून वाजवून स्वागत केले तसेच कार्यक्रमाची सांगता पोलीस बँड पथकाने वाजविलेल्या राष्ट्रगीताच्या धूनने करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तथा क्षेत्रीय अधिकारी श्री.राजीव सिंह यांनी केली तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एस.के.सुरवसे यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक श्री.संजय भुस्कुटे यांनी केले.
www.konkantoday.com