सुमित्राताई महाजन यांना ‘लोटिस्मा’चा ‘अपरान्त भूषण’ पुरस्कार,११ एप्रिलला वितरण सोहोळा, ‘ताई’ ग्रंथाचे लोकार्पण होणार


चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने देण्यात येणारा अपरान्त भूषण पुरस्कार लोकसभेच्या माजी सभापती सुमित्राताई महाजन यांना देण्यात येणार आहे. कोकणच्या आरमाराचे वैभव ज्यांनी अनंतपरीने वाढविले त्या सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्रीमंत रघुजीराव आंग्रे यांच्या हस्ते सुमित्राताई महाजन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ११ एप्रिल (सोमवार) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ब्राह्मण सहाय्यक संघात होईल.

‘लोटिस्मा’च्या अरविंद जाधव अपरान्त संशोधन केंद्राचा हा पुरस्कार संस्थेचे माजी अध्यक्ष कै. अरविंद तथा अप्पा जाधव यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येतो. पहिला अपरान्त भूषण पुरस्कार नामवंत इतिहास संशोधक आणि डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंतराव शिंदे यांना देण्यात आला होता. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. पंचवीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ६ जून २०१४ रोजी सुमित्राताईंची सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्या २०१४ ते २०१९ या काळात लोकसभेच्या सभापती होत्या. त्यांना २०२१ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुमित्राताईंनी आपल्या कार्यकाळात लोकसभाध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपल्या लेखणीने आणि वाणीने ठसा उमटविला आहे. साध्वी अहिल्याबाईंच्या जीवनावर त्यांनी लिहिलेल्या नाटकाचा यात विशेष उल्लेख करावा लागेल. तसेच रामायण आणि महाभारत यावर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत. समस्त चिपळूणकरांना सुमित्राताईंबद्दल विशेष आदर आहे.

सुमित्राताई महाजन यांच्या लोकसभा अध्यक्षपदाच्या कार्यावर श्रीमती मेधा किरिट यांनी ‘ताई’ हा ग्रंथ लिहिला आहे. आनंद लिमये यांनी प्रकाशित केलेल्या या ग्रंथाचे लोकार्पण या कार्यक्रमात होणार आहे. या सोहळ्याला चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी-प्रशासक प्रसाद शिंगटे, लेखिका श्रीमती मेधा किरीट आणि प्रकाशक आनंद लिमये हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघात ११ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्व नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह धनंजय चितळे आणि पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष अरुण इंगवले यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button