स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची उत्तम आर्थिक भरारी, विक्रमी वसुली, २५० कोटींचा ठेव टप्पा, स्वनिधीसह सर्वच निधीमध्ये लक्षणीय वाढ – ॲड.दीपक पटवर्धन
सन २०२१-२२ हे वर्ष अर्थकारणाच्या दृष्टीने खूप आव्हानात्मक होते. कोरोना लॉकडाऊनमुळे अर्थचक्र मंदावले होते. कमालीची अनिश्चितता अर्थकारणात आली होती. अशा या अस्थिर कालखंडात आपले अर्थव्यवहार वाढवणे हे मोठे आव्हान होते. मात्र स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने हे आव्हान लिलया पेलले आणि प्रतिवर्षाप्रमाणे उत्तम आर्थिक रिझल्ट प्राप्त केला आहे अशी माहिती स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
आर्थिक व्यवहारात सर्वांगीण वाढ
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी २५० कोटी ३१ लाख तर कर्ज १७० कोटी ५१ लाख झाले असून संस्थेच्या गुंतवणूका ११९ कोटी ६९ लाख झाल्या असून संस्थेचे निधी २९ कोटी पल्याड गेले आहेत. तर स्वनिधी ३१ कोटी ८५ लाख, मालमत्ता ३ कोटी ५५ लाख झाल्या आहेत.
उत्तम वसुली
सन २०२१-२२ या कोव्हीड प्रभावी वर्षातही संस्थेने कर्जदारांची वसुली नियमित भरण्याचे आपले कर्तव्य नेटाने बजावल्याने ९९.५१% एवढी विक्रमी वसुली झाली आहे. संस्थेचा नेट NPA 0% ठेवण्यात संस्था यशस्वी झाली. १७ शाखांपैकी ०८ शाखांची वसुली १००% झाली असून पावस, राजापूर, खंडाळा, नाटे या शाखाही जवळजवळ १००% च्या समीप आहेत. उर्वरित थकबाकीपैकी ५०% थकबाकी ही दोन कुटुंबांची थकबाकी आहे. संबंधित कर्जदारांविरुद्ध दावे दाखल केले असून सदर कर्जदारांना पर्याप्ततेपेक्षा अधिक मूल्याचे नोंदणीकृत तारण संस्थेने घेतले आहे. तसेच या थकीत कर्जाची १००% तरतूद संस्थेने केली आहे.
सातत्यपूर्ण नफा वृद्धी
संस्थेच्या सर्व शाखा नफ्यात असून चालू वर्षी ६ कोटी २१ लाख निव्वळ नफा प्राप्त झाला असून खेळत्या भांडवलाच्या २% प्रमाणात सदर नफा आहे. नफ्याचे हे प्रमाण आर्थिक संस्थेसाठी लक्षणीय आहे. सर्व प्रकारच्या तरतुदी केल्यानंतर राहिलेला निव्वळ नफा हा संस्थेच्या उत्तम व्यवस्थापनात कौशल्य व उपलब्ध निधीचा पर्याप्त वापर यामुळे शक्य झाला आहे.
उत्तम जनाधार
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये २४ कोटींनी वाढ झाली. संस्थेच्या १७ शाखांपैकी ८ शाखांमधील ठेवींमधील वाढ हि १ कोटीपेक्षा अधिक आहे. तर मारुती मंदिर शाखेमध्ये सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५ कोटी ३८ लाखांच्या ठेवी वाढल्या आहेत. एकूण २५० कोटी ३१ लाखाच्या ठेवी ह्या ७३७८७ ठेव खात्यांचे माध्यमातून संस्थेकडे ठेवी जमा आहेत.
संस्थेची ग्राहक सभासद संख्या ४०८९० झाली असून सर्व प्रकारच्या कर्जदारांची संख्या २२७३० झाली आहे. इतका विस्तृत, व्यापक जनाधार स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडे असून सातत्यपूर्ण अर्थकारणाला पूरक असा हा व्यापक जनाधार असलेले हे स्वरूपानंद अर्थविश्व आहे. ३१ वर्षाच्या अखंड वाटचालीत विश्वासार्ह, पारदर्शकता, ग्राहकाभिमुख, अद्यायावत तंत्रज्ञानानेयुक्त अशी ओळख दृढ केलेली स्वामी स्वरूपानंद पतसंस्था सहकार क्षेत्रात सहकार तत्त्वाला व्यावसायिकतेची जोड देत मार्गक्रमणा करीत आहे. व्हॉटसअपद्वारे ग्राहकांना त्यांचा बॅलन्स व खातेव्यवहार यांची माहिती मागताक्षणी देणारे स्वामी स्वरूपानंद हि कोकणातली एकमेव संस्था आहे.
अर्थकारण यशस्वी करत असताना हे अर्थकारण ज्या समाजामुळे वृद्धिंगत होते त्या समाजाचे दायित्व ओळखून स्वरूपानंद पतसंस्थेने सोशल वेल्फेअर फंडातून रु.१३ लाख ७१ हजार इतका खर्च कोरोनाग्रस्त कालावधीत सामाजिक महत्त्वाच्या उपयुक्त कार्यावर करून आपले दायित्व चोख बजावले आहे.
संस्थेला उत्तम यश प्राप्त झाले आहे. संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. ठेवीदारांना विश्वासार्ह व सुरक्षित अशी गुंतवणूक करता यावी हे ब्रीद नजरेसमोर ठेवून संस्थेचे कामकाज चालते. नफाखोरी न करता साधनांचा (पैशाचा) पूर्णांशाने विनियोग व नियमित वसूली यामुळे हे यश प्राप्त झाले. या यशाचे किमयागार सर्व ग्राहक, सभासद, कर्जदार, ठेवीदार, पिग्मीदार असून अधिकारी, कर्मचारी, पिग्मी प्रतिनिधी यांचे उत्तम सहकार्य संचालक मंडळाला लाभले. या सर्वांचे उत्तम टिमवर्कमुळे स्वरूपानंद यशस्वी होत आहे. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. अशी भावूक प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी दिली.
www.konkantoday.com