लांजात दुचाकी अपघातात पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू

लांजा: मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथे दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर पुढे बसलेल्या 5 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान लांजा आयटीआय कॉलेजजवळ घडली. मुस्तफा आतिक नाखवा (वय ५, रा. पावस) असे जागीच मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पावस येथील रहिवासी असलेले आतिक नाखवा हे आपल्या दोन मुले आणि पत्नीसह गुरुवारी सायंकाळी लांजातुन पावस येथे घरी दुचाकीवरून जात होते. दुचाकीवरून जात असताना लांजा आयटीआयजवळ त्यांची पल्सर मोटरसायकल रस्त्यावरून घसरली. मोटारसायकल वरून स्वतः नाखवा व पत्नी आणि दोन मुलगे असे चारजण प्रवास करत होते. दरम्यान महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू होते. या ठिकाणी त्यांना अंदाज न आल्याने वेगात असलेली मोटारसायकल रस्त्यावर विरुद्ध बाजूला जाऊन घसरून हा अपघात झाला.
या अपघातात आतिक नाखवा यांचा पाच वर्षाचा मुलगा मुस्तफा याचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात त्यांची पत्नी रुक्सार नाखवा ही गंभीर जखमी झाली आहे. तर दुसरा मुलगा अरजान हा किरकोळ जखमी झाला आहे. दुचाकी चालक अतिक नाखवा यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातात जखमी झालेल्या नाखवा कुटुंबीयांना लांजा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. लांजा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button