दापोलीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात एकाचा मृत्यू

दापोली : तालुक्यामधील आडेफाटा येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातामध्ये आशिष रहाटवळ (वय 38, राहणार आंजर्ले वडाचा कोंड) यांचा मृत्यू झाला. अभिजित खेडेकर (वय 36, राहणार आंजर्ले भंडारवाडा) हे जखमी झाले आहेत. या घटनेची फिर्याद अभिजित खेडेकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली. दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दि. 30 मार्च रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अभिजित खेडेकर व आशिष रहाटवळ हे दुचाकीवरून दापोली येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. कार्यक्रम पाहून परत आंजर्लेकडे जात होते. आडेफाटा येथे बागेजवळ संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आले असता समोरून दुचाकी घेऊन येणारा सचिन धोत्रे (राहणार सुकोंडी) याने भरधाव वेगाने दुचाकीला धडक दिली. या भरधाव धडकेमुळे आशिष रहाटवळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर अभिजित खेडेकर यांना दुखापत झाली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस. बी. पाटील करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button