घेरारसाळगड भुतराई धनगरवाडी येथे भिषण पाणी टंचाई. दुषित पाणी पिऊन रोगराई पसरण्याची भीतीने ग्रामस्थ हैराण


खेड : खेड तालुक्यातील घेरारसाळगड भुतराई धनगरवाडी येथे सध्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी  वणवण करावे लागत आहे. परिसरात असलेल्या एका डोहामध्ये मिळणाऱ्या पाण्यावर सध्या येथील ग्रामस्थ आपली तहान भागवत आहेत मात्र या डोहातील पाणी दूषित झाले असल्याने गावात रोगराई पसरण्याच्या भीतीनं ग्रामस्थ हैराण  आहेत. येथील ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय लक्षात घेत शासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी केली आहे.  
        
तालुक्याच्या अतिदुर्गम वसलेल्या घेरारसाळगड भुतराई धनगरवाडीतील ग्रामस्थ परिसरात असलेल्या काळकाई डोहातील पाणी पिण्यासाठी वापरत असतात. गेली  अनेक वर्ष याच डोहातून येथील ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र गतवर्षी झालेल्या अतिवृष्टिदरम्यान काळकाई डोहात दरड कोसळली आणि हा डोह पूर्णपणे दगडमातीने भरून गेला. या दुर्घटनेमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईचा विचार करून येथील ग्रामस्थांनी दरड कोसळून दगडमातीने भरून गेलेल्या काळकाई डोहातील गाळ काढावा अशी मागणी तेव्हाच संबंधित विभागाकडे केली होते.  या मागणीची दखल घेत जर काळकाई डोहातील गाळ काढण्यात आला असता तर आज येथील ग्रामस्थांना पाणी पाणी करण्याची वेळ आली नसती मात्र प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आज या परिसरातील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे  लागत आहे.
अतिवृष्टिदरम्यान तालुक्यातील अनेक नळपाणी योजना बाधित झाल्या, काही ठिकाणच्या जॅकवेल्स वाहून गेल्या तर काही ठिकाणी जलवाहिन्या उखडल्या गेल्या . त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाळ्यातच पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता.या ची दखल घेत  प्रशासकीय पातळीवर बाधित झालेल्या नळपाणी योजनांची काम तात्काळ सुरु करण्यात आली होती. मात्र घेररसाळगड येथील काळकाई डोहातील गाळ काढण्याकडे प्रशासनांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. परिणामी येथील ग्रामस्थांना आज पाणी टंचाईचे तीव्र चटके सोसावे लागत असून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. 
पिण्यासाठी एखादा हंडा पाणी मिळावा यासाठी येथील ग्रामस्थ मैलोंमैलची भटकंती करत आहेत मात्र कुठेही पाणी मिळत नसल्याने नाईलाजास्तव अखेर काळकाई डोहातील पाणी दूषित असल्याचे माहित असूनही तेच पाणी पीत आहेत. जनावरांनाही तेच पाणी पाजावे लागत आहे. डोहातील दूषित पाण्यामुळे  ग्रामस्थ आणि जनावरे आजारी पडण्याचे प्रकार वाढू लागले असल्याने पाण्यासाठी काय करावे हा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.        
काळकाई डोहात अतिवृष्टीत कोसळलेल्या दरडींचा पंचनामा करून त्याचा अहवाल तलाठी यांच्या  मार्फत खेडच्या तहसिलदार प्राजक्ता घोरपडे याना यांना सादर केला गेला होता. काळकाई  डोहोतील गाळ काढून या डोहाची पुर्नबांधणी करण्यासंबंधीचा प्रस्तावही ग्रामपंचायत घेरारसाळगड यांच्या वतीने शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र याची कोणतीच दखल न घेतली गेल्याने  डबक्यातील दूषित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
       
अतिवृष्टी नुकसान झालेल्या तालुक्यातील अन्य पाणीपुरवठा योजनांच्या पुर्नबांधणीसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून बाधित नळपाणी योजनांच्या दुरुस्थीची कामेही करण्यात आली आहेत. परंतु घेरारसाळगड भुतराई धनगरवाडीला ज्या डोहातून पाणी पुरवठा होतो तो डोहाच्या पुनर्बाधणीसाठी एक रुपयाही मंजूर झालेला नाही हा धनगर समाजावर अन्याय नाही काय? असा सवाल आखाडे यांनी उपस्थित केला आहे.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button