रत्नागिरी शहरातील झालेले रस्ते ही धूळफेक ठरणाररस्त्याच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह ; चौकशीची मागणी करणार – ॲड.दीपक पटवर्धन
रत्नागिरी शहर वासियांना वर्षभर खड्डेमय, खडतर रस्त्यांच्या प्रवासाची मनमानी शिक्षा दिल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण झाले. मात्र डांबरीकरण करताना योग्य दर्जाचे काम झालेले नाही असे सकृतदर्शनी जाणवते. अनेक रस्त्यांना खड्डे पडत आहेत. रस्त्यातून खडी बाहेर डोकावत आहे. रस्त्याच्या कडेचे डांबर, खडी साध्या पायाने विभागता येत आहे .अशी स्थिती अनेक रस्त्यांबाबत दिसत आहे. ही स्थिती पाहता हे रस्ते पहिल्या पावसाळ्यापर्यंत तरी टिकतील का ? हा प्रश्न आहे. रस्त्याची दुरुस्ती, नूतनीकरण होऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला असूनही अद्यापपर्यंत बहुसंख्य रस्त्यांना सीलकोट करण्यात आलेला नाही. मूळ अंदाजपत्रकात सीलकोट अंतर्भूत असेल तर प्रदीर्घ काळ उलटून पावसाळ्याला जेमतेम दोन महिने शिल्लक असतानाही रस्त्याला सीलकोट का केलेला नाही हा प्रश्न सतावत आहे. हा सर्व प्रकार जनतेच्या स्वास्थ्याशी खेळण्याच्या प्रकाराचा आहे. नगरपरिषदेचे काम, नेमलेले कंत्राटदार, कामाची पद्धती, कामाचा दर्जा याबाबत कोणतेही नियोजन, नियंत्रण निरीक्षण यंत्रणा नाही, मनमानी, बेफिकीरी हा स्थायीभाव असलेल्या या व्यवस्थेचे विपरीत परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करुन रस्त्यांच्या कामाचा सकृतदर्शनी दिसत असलेला वाईट दर्जा लक्षात घेऊन जनतेच्या तीव्र नाराजीच्या भावना लक्षात घेवून झालेल्या कामाची तपासणी व चौकशी करण्याची मागणी आपण करणार आहोत. या संदर्भात आवश्यक ती माहिती संकलित करून तांत्रिक सल्ला घेऊन ही मागणी करण्यात येईल अशी माहिती भाजपा जिल्हा अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी दिली.