‘मसाप’ची देवरुख, लांजा, राजापूर शाखांना मान्यता
चिपळूण : आद्य मराठी साहित्य संस्था (१९०६) असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेने आपल्या नुकत्याच (२१ मार्च) संपन्न झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख, लांजा आणि राजापूर शाखांना मान्यता दिली आहे. यामुळे आगामी काळात मसाप कार्यकारिणीत कोकणातून दोन प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. ‘मसाप’च्या उपाध्यक्षपदी कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांची निवड झाल्यानंतर कोकणात ‘मसाप’च्या कामाने अधिक वेग धरला आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यांनी कोकणात ‘मसाप’चे काम वाढत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पुढील काळात रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘मसाप’चा विस्तार करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मसापचे संपूर्ण कोकणात आठशे सभासद झालेले आहेत. यापूर्वी जिल्ह्यात दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी येथे शाखा सुरु झाल्या आहेत. नामवंत कवी अरुण इंगवले, कथाकार प्रा. संतोष गोणबरे, शाहीर राष्ट्रपाल सावंत, गुहागरचे राजेंद्र आरेकर, दापोलीचे गझलकार प्रा. कैलास गांधी, रत्नागिरीतील नाटककार अनिल दांडेकर, अॅड. विलास कुवळेकर आदी ‘मसाप’च्या कार्यविस्तारासाठी कार्यरत आहेत. मसापच्या वतीने शिवार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘मसाप’ने कोकणात नव्याने तीन शाखांना मान्यता दिल्याने साहित्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कै. श्रीकांत गोवंडे यांच्या स्मृत्यर्थ विविध संस्थांना देणगी
चिपळूण : येथील युनायटेड इंग्लिश स्कूलमधील संस्कृतचे गाढे व्यासंगी आणि माजी शिक्षक कै. श्रीकांत गोवंडे यांच्या स्मृत्यर्थ नुकतीच चिपळूणातील विविध संस्थांना श्रीमती मोहिनी गोवंडे यांनी देणगी दिली आहे. गोवंडे सरांच्या स्मृत्यर्थ चिपळूणातील ब्राह्मण साहाय्यक संघ, लक्ष्मी नारायण देवस्थान, परशुराम एज्युकेशन सोसायटी, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, कोवॅस, रामचंद्र वासुदेव मराठे न्यास मालदोली, विद्याभारती आणि नवकोकण एज्युकेशन सोसायटी या आठ संस्थांना प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांची देणगी देण्यात आली आहे. कै. गोवंडे सरांचे या सर्व संस्थांशी निकटचे संबंध होते. आशा लोवलेकर यांनी ही देणगी देण्यामागची श्रीमती मोहिनी गोवंडे यांची भूमिका विषद केली. यावेळी अविनाश पोंक्षे, मधुसूदन केतकर, प्रकाश देशपांडे, हेमंत भागवत, किशोर फडके, विनायक ओक, संजय खरे, सुमती जांभेकर, प्रसाद काणे, मनिष चितळे उपस्थित होते.
www.konkantoday.com