कोकणचा हा संपन्न इतिहास दाखवण्याची संधी,रत्नागिरीत होत असलेला कातळशिल्प महोत्सव
काही वर्षांपूर्वी एका सरकारी अहवालात कोकणच्या माळरान-सड्यांच्या उल्लेख “ओसाड माळरान” केल्याचे निदर्शनास आले.मग संबंधित विभागाच्या जवाबदार अधिकाऱ्यांना पावसाळ्यात त्याच सड्या वर नेऊन कोकण चे हे सडे किती संपन्न आहेत
हे दाखवून दिले होते…हा प्रसंग आठवण्याच कारण उद्यापासून रत्नागिरीत सुरू होत असलेला कातळशिल्प महोत्सव…
काय आहेत कातळशिल्प?कुठे आहेत हि कातळशिल्प?किती महत्वाची आहेत हि कातळशिल्प? हे सगळं जाणून घ्यायचे असेल तर एक संधी उपलब्ध होतेय पुढील दोन दिवसात …रत्नागिरीच्या थिबापॅलेस च्या प्रांगणात..
कोकणच्या कातळांवर हजारो वर्षांपूर्वी हि शिल्पे कातळांवर कोणी कोरली?कोणती हत्यारे वापरली?का काढली? त्यांचा अर्थ काय आहे?असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.काही वर्षांपूर्वी एक शूट च्या दरम्यान निवळी- गणपतीपुळे मार्गावर एक कातळशिल्प दिसलं …त्याची स्टोरी करताना पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हि भाषा वाचता येईल का या दृष्टीने काही तज्ञाना आणले….पण आजतागायत या चित्रांचा अर्थ काढता आला नाही….दरम्यान गेल्या काही वर्षात भाई रिजबुड,धनंजय मराठे यांनी कोकण च्या कातळांवरील हि कातळशिल्प शोधण्यासाठी पदरमोड करत शोध मोहित राबवली…गावागावातून लोकांनी आपल्या सडयावरील माहिती पुढे आणली … एकएक करत 73 हुन अधिक गावातून तब्बल 1700 हुन अधिक चित्र कातळामध्ये कोरलेली आढळली…भाई आणि मराठेच्या टीम ने ही सगळी कातळशिल्पे साफ केली…या सगळ्याचा खूप अभ्यास केला आणि शासकीय पातळीवर खूप पाठपुरावा हि…भाई आणि मराठें बरोबर चित्रीकरणासाठी मी यातील अनेक कातळशिल्पे फिरलोय.कातळशिल्पांचे हे विश्व केवळ थक्क करणार आहे… इतक्या मोठ्या संख्येने एका भूप्रदेशात कातळशिल्प असलेला कोकण हा कदाचित जगाच्या पाठीवरील एकमेव प्रदेश असेल…जगात जिथे जिथे अशी कताळशिल्पे मिळाली आहेत ती क्षेत्रे पर्यटन विश्वात प्रसिद्ध झाली आहेत….मात्र कोकणाला पर्यटनाच्या क्षेत्रात जगाच्या पाठीवर अधोरेखित करण्याची ताकद असलेल्या या विषयांच गांभिर्यच आम्हाला कळलेलं नाही.भविष्यात कोकणातील ही कातळशिल्पे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात येणार हे निश्चित आहे…रत्नागिरी आणि राजापूर परिसरात आढळणारी हि शिल्पे केवळ थक्क करणारी आहेत..त्यांचे आकार आपल्याला विचारात टाकतात…हजारो वर्षांपूर्वी हि चित्र कोणी आणि का काढली ?हे प्रश्न मनात वारंवार येत रहातात…आशियातील सगळ्यात मोठं कातळशिल्प जे राजापूर नजीक 16 मीटर ते 14 मीटर च्या परिसरात आहे..ते केवळ थक्क करणार आहे..
एखाद्या रत्नागिरीकराने ठरवलं तरी सलग काही दिवस फिरूनहि हि कातळशिल्पे त्याची पाहून होणार नाहीत…अशी सर्व कातळशिल्पे चित्र स्वरूपात दोन दिवसात थिबा पॅलेस च्या आवारात मांडली जाणार आहेत.सुहास ठाकुरदेसाई,भाई,मराठे या साऱ्यांच्या प्रयत्नातून हा अमूल्य ठेवा चित्र रुपात एकत्र पहायला उपलब्ध होत आहे. आपल्या मुलांना कोकणचा हा संपन्न इतिहास दाखवण्याची संधी या निमित्ताने पालक वर्गाला मिळणार आहे.आपल्याच कोकणाकडे पाहण्याची एक वेगळी नजर देऊन जाणार हे प्रदर्शन प्रत्येकाने आवर्जून पहावं असंच आहे.
स्थळ-थिबापॅलेस,रत्नागिरी.
दिनांक-26 व 27 मार्च 2022
वेळ-सकाळी 10 ते रात्री 10
-सचिन देसाई,रत्नागिरी.
9422052444
www.konkantoday.com