गुढीपाडव्याला हिंदु एकतेचे दर्शन घडवत जल्लोषात निघणार स्वागतयात्रा
रत्नागिरी : श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदूकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रा येत्या २ एप्रिलला हिंदु एकतेचे दर्शन घडवत मोठ्या जल्लोषात काढण्यात येणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशभूषेत रत्नागिरीकर हिंदु मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सुमारे ७५ संस्थांचे चित्ररथ, वाहने, ढोल, ताशापथके सामील होणार आहेत. यासंदर्भात आज सायंकाळी पतितपावन मंदिर संस्थेत बैठक झाली.
या बैठकीला भैरी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष रवींद्र (मुन्नाशेठ) सुर्वे, उपाध्यक्ष राजन जोशी, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, नववर्ष स्वागत यात्रेचे संयोजक आनंद मराठे, पतितपावनचे माजी अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, कॅप्टन कोमल सिंग, मोहन भावे, संतोष पावरी, सुधाकर सावंत, मुकुंद जोशी, यांच्यासमवेत सुमारे १०० पुरुष, महिला भगिनी उपस्थित होत्या.
पुढील बैठक २९ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता पतितपावन मंदिरात आयोजित केली आहे. तसेच स्वागतयात्रा प्रचारासाठी दुचाकी फेरीचे नियोजन करण्यात येत आहे. स्वागतयात्रेत गुलाल उधळला जाणार नाही. हिंदु बांधव आपापल्या परिसरात सजावट, रस्त्यावर रांगोळी काढून स्वागत करणार आहेत.
सुरवातीला स्वागतयात्रेचे दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर गेल्या १८ वर्षांत या स्वागतयात्रेमध्ये १५० हून अधिक संस्था, चित्ररथ सहभागी झाले. त्याचा आढावा घेण्यात आला. आजच्या सभेलाही चांगली उपस्थिती होती. विविध संस्था, संघटनांनी स्वागतयात्रेत चित्ररथासंबंधी माहिती दिली. ही स्वागतयात्रा जल्लोषात निघण्याची वाट सर्व हिंदु बंधू भगिनी आतुरतेने वाट पाहत आहेत, असे या वेळी सांगण्यात आले. यंदा पंधरा ते वीस नवीन संस्था सहभागी होणार आहेत. यात्रा जल्लोषात व मोठ्या दणक्यात निघेल, आपण सारे हिंदु एक आहोत याचे दर्शन घडेल, अशी विराट यात्रा काढण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
श्री भैरी मंदिरातून ९.३० वाजता सुरवात होईल. श्री देव भैरी, खालची आळी, मुरलीधर मंदिर, विठ्ठल मंदिर, गोखले नाका, मारुती आळी, जयस्तंभ, राम आळी, राधाकृष्ण नाका, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिरात सांगता होईल. मारुती मंदिर येथूनही सकाळी ९.३० वाजता स्वागतयात्रा निघेल आणि ही यात्रा मूळ स्वागतयात्रेत जयस्तंभ येथे सामील होईल.