रत्नागिरी जिल्ह्याचा प्रवास कोरोना मुक्तीकडे
आज रोजी जिल्ह्यामध्ये कोरोनाने बाधीत एकही रुग्ण नाही. यामध्ये रुग्णालयामध्ये ॲडमिट व गृहविलगीकरणा मध्येही कोरोनाने बाधीत एकही रुग्ण जिल्हयात नाही. आजपर्यंत स्वॅब घेतलेनंतर अबाधित असलेले रुग्ण 934256 इतके आहेत, कोरोनाने बाधीत झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 84466 इतकी आहे. तर 81932 रुग्ण आजपर्यंत कोरोनामुक्त झाले असून, हे प्रमाण 97 टक्के आहे. तसेच आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 2534 इतकी असून, हे प्रमाण 3 टक्के आहे. प्रत्येक गावातील व शहरी भागातील नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करुन व जनतेचा जनसहभाग मिळवून प्रत्येक नागरिकाचे कोविड लसीकरण करण्यात आलेले आहे. जिल्हयामध्ये आजपर्यंत एकूण कोविड-19 लसीकरणाची पहिल्या डोसची मात्रा 1053886 देण्यात आली असून, हे प्रमाण 97.41 टक्के आहे. व दुसऱ्या डोसची मात्रा 879907 असून हे प्रमाण 81.33 टक्के आहे. अशी एकूण 1933793 लसींच्या मात्रा देऊन नागरिकांना पूर्णपणे सुरक्षित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सन 2007 वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले पात्र(15 ते 18 वर्षे वयोगटातील) पहिल्या डोसची मात्रा 49475 लसीच्या मात्रा देण्यात आली असून हे प्रमाण 68.96 टक्के असून, दुसऱ्या डोसची मात्रा 34934 असून हे प्रमाण 48.69 टक्के आहे. 15 मार्च 2008 ते 15 मार्च 2021 मध्ये जन्मलेल्या सर्व मुलांना पहिल्या डोसची मात्रा 891 लसीच्या मात्रा देण्यात आली आहे. कोविड-19 लसीकरणला जिल्हयात गती देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी तसेच आरोग्य यंत्रणामध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी वर्ग, आरोग्य कर्मचारी वर्ग, ग्राम कृती दल, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका, स्वयं सेवी संस्था व मोहिमेस सहकार्य करणारे इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपआपले स्तरावर सहकार्य केलेले आहे. आज जिल्ह्यातील 12 वर्षावरिल सर्व नागरिकांचे कोविड-19 लसीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रिकॉशन डोस हा 60 वर्षावरिल सर्व नागरिकांना तसेच 18 ते 59 वयोगटामधील फक्त आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांना देण्यात येत आहे. अशी लसीकरण सत्रे जिल्ह्यामध्ये सुरु आहेत. या कोविड-19 लसीकरणाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देण्याचे आवाहन मा.श्री.बी.एन.पाटिल जिल्हाधिकारी रत्नागिरी व मा.डॉ.इंदुराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी नागरिकांना केले आहे. कोविडचे रुग्ण जगाच्या अनेक भागांमध्ये वाढत आहेत. पूर्वी कोविड प्रकरणांमध्ये वाढ केवळ दक्षिण आशियाई देशांपुरती मर्यादित होती. परंतु आता चीन आणि युरोपमध्येही प्रकरणे वेगाने वाढत आहेत. जगातील साप्ताहिक नवीन प्रकरणे आता 8-10% च्या साप्ताहिक वाढीसह 11 दशलक्षाहून अधिक आहेत. काही देशांमध्ये 2 वर्षांपूर्वी साथीच्या रोगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतच्या सर्वाधिक नवीन कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे. दक्षिण कोरियामध्ये एका दिवसात 6.21 लाख नवीन कोविड प्रकरणे आणि जर्मनीमध्ये एका दिवसात 2.62 लाख नवीन कोविड प्रकरणे आणि युनायटेड किंग्डममध्ये गेल्या 24 तासात सुमारे 94,000 रुग्ण आढळले आहेत. दक्षिण कोरियाची लोकसंख्या ५.१८ कोटी आहे आणि जर्मनीची लोकसंख्या ८.३२ कोटी आहे. त्या तुलनेत सुमारे 12.2 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या राज्यात, दुसऱ्या वाढीमध्ये एका दिवसात सर्वाधिक 68,000 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. आपल्या राज्यात सर्व निर्बंध जवळजवळ शिथिल झाल्यामुळे आपण या वेळी सतर्क राहणे आवश्यक आहे. यासाठी आपणाला पुढील गोष्टी करण्याची आवश्यकता आहे.
नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, फिजिकल डिस्टंसिंगचा वापर करावा, नियमीत मास्कचा वापर करुन योग्य वेळी सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच नागरिकांमध्ये केलेल्या लसीकरणामध्ये १०० टक्के लाभार्थ्यांचा पहिला डोस पूर्ण होईल याकडे लक्ष देऊन व त्यानंतर ज्या लाभार्थ्यांचा दुसरा डोस राहिला आहे तो प्राधान्याने पूर्ण करण्याचे आवाहन डॉ.अनिरुध्द आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी केले आहे.