खेडमध्ये दागिने पॉलिश करणे पडले महाग; चोरट्यांकडून सोन्याची चोरी
खेड : तालुक्यातील वावेतर्फे नातू गावात दि. २३ रोजी सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो सांगत दोन अज्ञात भामट्यांनी सोने चोरल्याचा प्रकार घडला.
सुधीर तुकाराम शिबे यांच्या घरी दि. २३ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात वक्ती आल्या. सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे त्यांनी सांगितले. शिबे यांनी पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र त्यांच्याकडे पॉलिश करण्यासाठी दिले. पॉलिश करण्यासाठी दिलेले मंगळसूत्र एका पावडरमध्ये घालून ते निघून गेले. मात्र शिबे दाम्पत्याने पावडरमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र बाहेर काढले असता त्याची झीज झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. मंगळसूत्र पॉलिश करण्यासाठी देण्यापूर्वी त्याचे वजन काळ्या मण्यासोबत २१.६५० ग्रॅम होते मात्र पॉलिश केल्यानंतर त्याचे वजन १०.५६ ग्रॅम एवढेच राहिले आहे. त्यामुळे अज्ञातांनी मंगळसूत्रातील ५.७९ ग्रॅम सोने चोरल्याची तक्रार सुधीर शिबे यांनी खेड पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.