‘समुद्री शेवाळ शेती’ प्रशिक्षणाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी, आणि राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समुद्री शेवाळ शेती या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा दि. २३ मार्च रोजी मा. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
यावेळी मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे, मत्स्य विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. केतन चौधरी, मत्स्य संवर्धन विभागप्रमुख डॉ. सुरेश नाईक आणि नाबार्डच्या रत्नागिरी जिल्हा उपव्यवस्थापक श्रीमती श्रद्धा हजीरनिस, गद्रेमरीनच्या व्यवस्थापिका श्रीमती प्रेरणा जुवेकर-हिरवे, महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरीचे अमरीश मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावरून बोलताना जिल्हाधिकारी यांनी नमूद केले की, कोकणाला समुद्री शेतीकरिता पोषक वातावरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा स्रोत फार मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे . त्याचा उपयोग समुद्रकिनारी राहणाऱ्या महिलांनी समुद्री शेवाळ शेती करण्यासाठी केल्यास, समुद्रालगतच्या गावामध्ये कुटीर उद्योगाची साखळी निर्माण होईल व त्यायोगे शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण होऊन स्थानिक लोकांचे आर्थिक व सामाजिक स्तर ऊंचावण्यास मदत होईल.
नाबार्डच्या रत्नागिरी जिल्हा विकास प्रबंधक श्रीमती श्रद्धा हजीरनिस यांनी सामान्य माणसाच्या विकासामध्ये नाबार्डचे अप्रत्यक्ष योगदान मोठ्या प्रमाणात आहेच, तसेच समुद्र शेवाळ शेतीच्या भविष्यातील प्रशिक्षणासाठी नाबार्डचे कायम सहकार्य लाभेल, अशी ग्वाही दिली.
समुद्र शेवाळाच्या शेतीचे महत्व डॉ. प्रकाश शिनगारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विस्तृतपणे समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मत्स्य विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. केतन चौधरी यांनी केले. या कार्यक्रमामध्ये लोक संचालित संसाधन केंद्र रत्नागिरीच्या प्रमुख श्रीमती योगिता भाटकर व त्यांच्या पंचवीस महिला सहकारी उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी, केंद्रीय सागरी मत्स्यकी संशोधन संस्था मुंबई केंद्र यांचे विशेष सहकार्य लाभले.