“तू माझा मुलगा नाहीस” असे हिणवणाऱ्या बापाच्या डोक्यात मुलाने घातला हातोडा

लांजा तालुक्यातील पुनस गावातील घटना; जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

लांजा : आईवर चारित्र्याचा संशय घेऊन “तू माझा मुलगा नाहीस” असे सातत्याने हिणवणाऱ्या बापाच्या डोक्यात अल्पवयीन 17 वर्षीय मुलाने लोखंडी हातोडा मारून त्याचा खून केल्याची घटना लांजा तालुक्यातील पुनस गावात घडली. सोमवारी २१ मार्च रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर जखमी वडिलांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.

रवींद्र रावजी कांबळे (वय ४० वर्षे,राहणार पुनस बौद्धवाडी) असे मृत वडिलांचे नाव असून पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र कांबळे हे पत्नी रेशमी हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचे. त्याचप्रमाणे मुलालादेखील “तू माझा मुलगा नाहीस” असे बोलून हिणवायचे. यातून प्रत्येकवेळी ते जोरदार भांडण करायचे. २१ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास रवींद्र कांबळे यांनी पत्नी रेशमी हिच्यासोबत जोरदार भांडण केले. तसेच मुलाला हिणवले. याचा राग येऊन मुलाने घरातील लोखंडी हातोडा वडील रवींद्र कांबळे यांच्या डोक्‍यावर मारला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना जखमी अवस्थेत सोमवारी रात्री रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुगडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button