रत्नागिरीचा शाश्वत विकास या कार्यक्रमाच्या माध्यमातून विकासाच्या संकल्पना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न–उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

रत्नागिरी दि. 20(जिमाका):- रत्नागिरीचा ऐतिहासिक दृष्टीने विकास करताना नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे. ही बाब रत्नागिरीचा शाश्वत विकास या कार्यक्रमात सादरीकरणाद्वारे  जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न  करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
   आज रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित “रत्नागिरीचा शाश्वत विकास” या कार्यक्रमात चित्रफीत सादरीकरण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, उद्योजक अण्णा सामंत, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. 
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली.
     या कार्यक्रमामध्ये रत्नागिरीच्या शैक्षणिक, पर्यटन, क्रीडा, रस्ते, पाणीपुरवठा या सर्वांगीण विकास नियोजनाची माहिती चित्रफीतीच्या माध्यमातून देण्यात आली.
  यशवंतराव चव्हाण विद्यापीठ उपकेंद्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथालय व संशोधन केंद्र उभारणे, लोकमान्य टिळक शासकीय विभागीय ग्रंथालय इमारतीचे नूतनीकरण व सुशोभिकरण करणे यामध्ये ग्रंथालयाचे संगणकीकरण, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्ष उभारण्यात येणार आहे.
 महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातंर्गत कौशल्य विकास केंद्र सुरु करणे, जिल्ह्यातील पहिले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी येथे सुरु करण्यात येत असून यामध्ये 300 विद्यार्थ्यांकरीता एकूण पाच शाखांचा समावेश आहे.
रत्नागिरी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मारक वास्तूचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असून याअंतर्गत वास्तूमधील खोल्यांची डागडुजी, कर्मचारी निवास व पर्यटकांना लोकमान्य टिळकांच्या माहिती देण्याकरीता मिनी थेटर उभारण्यात येणार आहे.
भगवती किल्ला येथे शिवसृष्टी विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये नऊ जलदुर्गांची प्रतिकृती, लाईट हाऊस, लेझर शो, म्युझियम, आदींचा समावेश असणार आहे.
कोकणातील व महाराष्ट्रातील पहिले थ्री डी तारांगण उभारण्यात येणार असून या तारांगणामध्ये खगोल विश्वाची सफर करता येणार आहे. हे तारांगण राज्यभरातील पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल.
  मालगुंड येथे प्राणी संग्रहालय व रेस्क्यू सेंटर तयार करण्यात येणार असून यामुळे पर्यटनात वाढ होण्यास चालना मिळेल.वन्यजीव अभ्यासकांसाठी हे संग्रहालय आकर्षण ठरणार असून सिंधुरत्न योजनेतून याकरीता निधी उपलब्ध होणार आहे.
मिऱ्या बंदर येथे धूपप्रतिबंधक बंधारा सुशोभिकरण करण्यात येणार आहे.  या सुशोभिकरणानंतर येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे.
भारतातील पहिल्या अतिवेगवान पॅसेंजर जेट बोटद्वारे रत्नागिरी ते गणपतीपुळे या समुद्रमार्गावरुन सफर करता येणार आहे.  यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर अनोखी प्रसिध्दी मिळेल. या बोटीतून एका वेळी 22 पर्यटक सुमारे 20 मिनिटात रत्नागिरी ते गणपतीपुळे असा प्रवास करु शकतील.
रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार, मारुती मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जयस्तंभ, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या ठिकाणांचे सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टस मार्फत सुशोभिकरण करण्यात येत आहे. 
रत्नागिरी शहरातील पुढील 30 वर्षाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता संपूर्ण शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा याकरीता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत नळपाणी योजना मंजूर करण्यात आली आहे.आता शहराला दर दिवशी दोन कोटी वीस लाख लीटर पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे.
कोकणातील पर्जन्यमानामुळे शहरातील रस्ते वारंवार खराब होतात यावर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून मुख्य रस्ते काँक्रीटीकरण व डांबरीकरण करण्यात आले आहेत.  याकरीता 28 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. 
ऑलिम्पिक धर्तीवर त्या स्तराचा जलतरण तलाव लवकरच शहरात तयार करण्यात येत असून याचा उपयोग सामान्य नागरिक, खेळाडू यांना होणार आहे.  रत्नागिरी नगरपरिषदेच्या माध्यमातून हा तलाव बांधण्यात येत असून याकरीता 15 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.  राष्ट्रीय/राज्य/जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धांचे आयोजन भविष्यात या तलावात करता येणे शक्य होणार आहे.
प्रमोद महाजन क्रीडा संकुलाचे सुशोभिकरण पूर्ण झाले आहे. एमआयडीसी येथे जिल्हा क्रीडा संकुल उभारणीचे काम सुरु आहे.
रत्नागिरी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता रत्नागिरी नगर परिषदेची आधुनिक सोयीयुक्त नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे.   
जनतेची सर्व शासकीय कामे एकाच ठिकाणी व्हावीत याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हरीत इमारत या संकल्पनेतून नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुविधेकरीता जिल्हा परिषद व पंचायत समितीची देखील नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.
सध्या शहरात असणारे शासकीय विश्रामगृहातील कक्ष अपुरे पडत असल्याने शासकीय विश्रामगृह इमारतीचे नव्याने विस्तारीकरण करण्यात येणार आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button