पोलादपूरच्या अंडरपासमुळे वाहतुकीची कोंडी
पोलादपूर : शहराचे दर्शन होऊ नये यासाठी अंडरपास जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या वरील बाजूस असलेल्या पूर्वेच्या सर्व्हिसरोडवर सध्या वाहनांच्या लांबचलांब रांगा उभ्या राहून वाहतुकीची कोंडी होत आहे. यावेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अंडरपासच्या खड्डयात पडण्याची शक्यता लक्षात घेत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम ड्रॉईंग आणि नकाशाप्रमाणे तसेच नियोजनानुसार नसल्याचे स्पष्ट मत कोर्टकमिशनने गेल्या महिन्यात केलेल्या सर्वेक्षणांती केलेल्या अहवालामध्ये नमूद केले आहे.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग होऊ नये यासाठी चाललेल्या राजकीय प्रयत्नांना पेणचे आमदार मधु शेटये यांनी विरोध करण्यास सुरूवात केल्यानंतर कशेडी घाटातूनच महामार्ग जाण्यासाठी तत्कालीन बांधकाम राज्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांनी मान्यता दिली. व्यावसायिकांनी केलेल्या अघोषित विरोधातून पोलादपूर येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये 60 मीटर रूंदीचे भुसंपादन आवश्यक असताना केवळ 45 मीटर रूंदीच्या भुसंपादनाची मानसिकता दर्शविल्यामुळे पोलादपूर शहरात हे चौपदरीकरण अरूंद राहिले. मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग नियोजित ड्रॉईंग आणि नकाशाप्रमाणे बनविण्यात आलेला नसल्याचे कोर्टकमिशनने नेमलेल्या समितीच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले असताना पोलादपूर येथील अंडरपास महामार्गावर पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील सर्व्हिसरोडना जोडणारे तब्बल जादाचे पाच पूल उभारण्यात आले आहेत. तर पश्चिमेकडील सर्व्हिसरोड मात्र अद्याप वाहतूकीस सुरू झालेला नसल्याने गोव्याकडे आणि मुंबईकडे होणारी वाहतूक फक्त पूर्वेकडील सर्व्हिसरोडवरून केली जात आहे. यामुळे या शिमगोत्सवापासून या सर्व्हिसरोडवरून एकेरी वाहतुक होण्याऐवजी दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यामुळे अंडरपासच्या खड्डयात ठिकठिकाणी सर्व्हिसरोड कोसळण्याची परिस्थिती दिसून येत आहे. परिणामी, वाहतुकीची कोंडी होऊन या पूर्वेकडील सर्व्हिसरोड वाहने जीव मुठीत घेऊन चालविली जात आहेत.