संधीचे सोने करणे आपल्याच हातात- जिल्हाधिकारी डॉ. बी एन.पाटील
26 प्रशिक्षणार्थींना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण
रत्नागिरी दि.18(जिमाका):- प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी संधी प्राप्त होत असते,मात्र या संधीचे सोने करणे आपल्याच हातात असते,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी आज येथे केले.
पर्यटन विभाग,महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबईने आयोजित टुरिस्ट गाईड ट्रेनिंग कार्यक्रम येथील हॉटेल सी फॅन्स येथे आज (दि.18 मार्च) रोजी संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील म्हणाले की, प्रत्येक माणसाला एक संधी येते. त्या संधीचे सोने करणे आपल्या हातात असते. आपण कोणत्या विषयात शिक्षण घेता हे महत्वाचे नाही पण त्या विषयात किती आत्मीयतेने काम करता आणि त्यात अधिकाधिक ज्ञान घेऊन किती प्रावीण्य मिळविता, तज्ञ होता यावर यश अवलंबून आहे. त्या विषयातील अभ्यासक आपल्याला शोधत आले पाहिजेत तरच आपण घेतलेल्या शिक्षणाला महत्व आहे. त्याचप्रमाणे पर्यटनस्थळांची माहिती तयार करून ती माहिती फेसबुक, यू-ट्यूब, ट्विटर अशा विविध सोशल मीडिया घटकांचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचली तर लोकांकडूनही निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल.
या कार्यक्रमात 26 विद्यार्थ्यांना गाईड ट्रेनिंगचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांच्या हस्ते आणि पर्यटन संचालनालयाचे कोकण विभाग उपसंचालक श्री.हनुमंत हेडे, आयआयटीटीएम ग्वाल्हेर चे डॉ. चंद्रशेखर बरवा, लांजा कॉलेजचे प्राचार्य डॉ.अरविंद कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.राहुल मराठे, रत्नागिरी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्री.राजू भाटलेकर आणि श्री.सुहास ठाकूर-देसाई यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना गाईड ट्रेनिंगचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील 14 मुले आणि 12 मुली अशा एकूण 26 प्रशिक्षणार्थींची निवड प्रशासकीय स्तरावरुन करण्यात आली होती. त्यात पर्यटनाची आवड व माहिती असणाऱ्यांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात आले. पर्यटकांना आपल्या परिसरातील पर्यटन स्थळे माहिती व्हावीत व येथील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने शासन स्तरावर अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती पर्यटन कोकण विभाग उपसंचालक श्री.हनुमंत हेडे यांनी यावेळी दिली.
000000