संगमेश्वरच्या टेम्पोची कशेडी घाटात चहा पिणाऱ्यांना धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात शुक्रवारी पहाटे झालेल्या एका विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले. चहा पिण्यासाठी थांबलेल्या, गोवा येथे जाणार्या प्रवाशांना संगमेश्वर येथून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला. पोलादपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
18 रोजी पहाटे ऑरा कार क्रमांक (एमएच 48, बीटी 1817) या कारमधून जयेश रमेश राऊत (वय 38) आणि अंजली जयेश राऊत (वय 32) दोन्ही राहणार विरार मुंबई यांच्यासह चालक विनीत मधुकर राऊळ (वय 37) हे तिघेही विरार-मुंबई येथून गोव्याला जात होते. कशेडी बंगला येथे गाडी थांबवून चालक विनीत राऊळ तसेच जयेश राऊत हे दोघे चहा पीत उभे होते. त्याचवेळी मोटार सायकल बजाज पल्सर क्रमांक (एमएच 08, टी 3666) वरील अशोक तुळशीराम पांगले (वय 50) मुंबई (जखमी) आणि अशोक यशवंत राऊत (रा.कसबा, ता. संगमेश्वर) हे देखील चहा पिण्याकरिता थांबले होते.
याचवेळी मुंबई ते संगमेश्वर असा जाणारा टाटा एसी गोल्ड टेम्पो (एमएच 08, एटी 9211) चा चालक-महम्मद यासीन उमर फारुख पठाण (राहणार संगमेश्वर मापारी मोहल्ला) हा मोहम्मद हमाद उमर फारूक पठाण (वय 25, रा. संगमेश्वर मापारी मोहल्ला) याच्यासह मुंबई ते संगमेश्वर असता टेम्पो चालवत जात होता. झोप अनावर झाल्याने गाडीवरील ताबा सुटून महामार्गालगत टपरीवर चहा पीत असलेल्या लोकांना ठोकर मारून अपघात केला.
अपघातात गंभीर जखमी विनीत मधुकर राऊळ (वय 37, रा. विरार) याला नरेंद्राचार्य महाराज ट्रस्टच्या अॅम्ब्युलन्सने पोलादपूरला ग्रामीण सरकारी रुग्णालय येथे दाखल केले असता उपचारादरम्यान तो मयत झाला. जखमींवर उपचार सुरू असून काहींना किरकोळ जखमा असल्याने उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. अपघातस्थळी असलेली वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत चालू करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस उपनिरिक्षक ए.पी.चांदणे यांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दिलीप सारंगे तपास करीत आहेत.