कसब्यातील कर्णेश्वराच्या शिवलिंगावर पडली सूर्यकिरणे
संगमेश्वर : तालुक्यातील कसबा या ऐतिहासिक गावात असणाऱ्या चालुक्यकालीन कर्णेश्वर मंदिरातील शिवलिंगावर गुरुवारी सकाळी ७ : १५ वाजता सोनेरी किरणांनी अभिषेक केला. यावेळी मंदिरात आलेले शिवभक्त किरणांचा हा सोनेरी अभिषेक पाहून कृतकृत्य झाले आणि नतमस्तकही झाले.
पूर्वीची मंदिरे उभारताना स्थापत्यशास्त्राचा अभ्यास किती प्रगत होता , याची अनुभूती अशा प्रसंगातून येते. कसबा येथील कर्णेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असल्याने काही ठराविक कालावधीत मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर सूर्य आल्यानंतर शिवलिंगावर असा किरणांचा सोनेरी अभिषेक होतो. हे मंदिर अप्रतिम शिल्पकलेसाठी प्रसिध्द आहे. मंदिर प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शिल्पात कोरलेले प्रसंग अचंबित करतात . या मंदिरातील दगडी झुंबर देखील अत्यंत नाजूक असून शिल्पकारांच्या अद्भुत कौशल्याची साक्ष या नाजूक कलाकुसरीतून दिसून येते .
शुक्रवारी सकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास सूर्यकिरणे थेट कर्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करीत शिवलिंगावर पडल्यानंतर येथील वातावरणात एक अलौकिक असे चैतन्य निर्माण झाले . यावेळी उपस्थित काही मोजक्याच भक्तांना हा नयनरम्य सोहळा पाहण्याचे भाग्य लाभले.