विद्यार्थी, ग्रामीण जनता, चाकरमानी या सर्वांना वेठीला धरून परिवहनमंत्री गंमत पाहत आहेत का ? – ॲड. दीपक पटवर्धन
एस.टी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याचा सरकारचा दृष्टिकोन नाही. एस.टी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून एस.टी चे अस्तित्व धोक्यात घालवायचे असे जणू ठरवूनच सर्व निगरगट्टपणा सुरू आहे. तीन महिन्यांपेक्षा अधिककाळ एस.टी बंद आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. आता अन्य विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील. त्यांचे परीक्षा केंद्रापर्यंत जाण्या-येण्यासाठी हक्काची एस.टी सुविधा बंद आहे. मात्र राज्यशासन याबाबत उदासीन. तसेच नोकरदार आज एस.टी सुविधा बंद असल्याने कुठेतरी, कसेतरी राहून वेळ मारून नेत आहेत. नियमित एस.टी सेवा बंद, दुसरीकडे प्रायव्हेट वहातूक सेवा आकारत असलेले भयंकर चार्जेस यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
होळी उत्सव
होळी उत्सवासाठी चाकरमानी गावाकडे येतो. हा दरवर्षीचा रिवाज आहे. गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट होते. त्यामुळे यावर्षी गावाकडे यायला चाकरमानी आसुसलेला आहे. ग्रामदेवतेचा पालखी उत्सव सर्वांसाठी श्रद्धेचा विषय आहे. पालखी घराकडे येणार ही गोष्ट हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जाते. मात्र महाआघाडी शासन प्रामुख्याने परिवहन मंत्री तथा पालकमंत्री महोदय आपल्या जिल्ह्यातील चाकरमान्यांना गावी पोहोचण्यासाठी काही व्यवस्था करतील, स्वतंत्र्य एस.टी सोडल्या जातील अशी अपेक्षा होती मात्र ढिम्म सरकारने याबाबत काहीही केले नाही. परिणामी चाकरमान्यांना प्रायव्हेट गाड्यांच्या मनमानी अतिरिक्त चार्जेस व मनमानी वर्तणुकीचे चटके खाण्यासाठी वाऱ्यावर सोडून दिले अशी स्थिती आहे असे ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.
मोठ्या प्रमाणावर रत्नागिरीच्या कोकणाच्या विविध गावांमध्ये श्रद्धेने येणाऱ्या चाकरमान्यां प्रति इतकी असंवेदनशीलता का ? हा प्रश्न पडतो. कोकणात सत्ताधारी पक्षाचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र सत्तेचा कैफ चढलेल्या सत्ताधीशांना आता सत्तासुंदरी पुढे आपल्या लोकांची सुखदुःखे, हाल, असुविधा दिसेनासे झाले आहेत अशी बोचरी टिप्पणी ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली.
गावातील लोकांना एस.टी सेवा बंद असल्यामुळे अत्यावश्यक गरजेसाठी, खरेदीसाठी, औषधोपचारांसाठी शहराकडे येण्यासाठी खूप खर्च करावा लागत आहे. मात्र परिवहन मंत्री असलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री जनता जनार्दनाचे हाल दुरून पाहून स्वस्त बसले आहेत. हे रत्नागिरीचे दुर्दैव म्हणावे लागेल.
रत्नागिरी एस.टी स्टँडचे काम ठप्प आहे. आता एस.टी गाड्याही ठप्प झाल्याने एस.टी स्टँड कशाला बांधायचा असा विचार शासनाने सुरू केला की काय ? असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. शाळांचे, महाविद्यालयांचे विद्यार्थी त्यांचा शाळापर्यंत, कॉलेज पर्यंतचा प्रवास खेडोपाड्यापासून खरेदीसाठी, औषधोपचारासाठी, नोकरी-व्यवसायासाठी येणारा मोठा वर्ग या सर्वांचे हाल नजरअंदाज करत महाआघाडी शासन सत्ता कैफात आकंठ बुडाले आहे. चाकरमानी आपल्या गावी जाण्यासाठी आतुरलेला आहे. मात्र तीन तीन पक्ष एकत्र येऊन महाआघाडी केलेले शासन प्रवासासाठी सुविधा पुरवू शकत नाही ही शोकांतिका आहे. एस.टी संपावर तोडगा काढायचा नाही असे जणू ठरलेले आहे. आपल्या बगलबच्च्यांना आपल्या खाजगी ट्रान्सपोर्टना एस.टीशी स्पर्धा करावी लागू नये म्हणून योजना करून सर्व काही सुरू आहे का ? असा प्रश्न ॲड. दीपक पटवर्धन यांनी विचारला.
महाआघाडी शासनाला जनतेचे हाल उघड्या डोळ्यांनी दिसत नसतील तर छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन आम्ही राज्य करतो ही शेखी मिरवणे बंद करावे अशी परखड प्रतिक्रिया ॲड. दीपक पटवर्धन भा.ज.पा, जिल्हाध्यक्ष यांनी दिली.
मा.पालकमंत्री, रत्नागिरी तथा परिवहन मंत्री महोदयांनी कोकणातले विद्यार्थी, चाकरमानी व खेडोपाड्यातील जनता यांचे होणारे हाल लक्षात घेवून सुकर प्रवासासाठी व्यवस्था करावी. किमान प्रायव्हेट वहातुकदारांकडून होणारी लुट व मुजोरी थांबवण्यासाठी योग्य यंत्रणा सतर्क करावी अशी मागणी भा.ज.पा जिल्हाध्यक्षांनी केली.