निवडणुकीतील वाद शिमगोत्सवात उफाळले,राजवाडी सुर्वेवाडी येथील दोन गट आमनेसामने; नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
संगमेश्वर : तालुक्यातील राजवाडी सुर्वेवाडी येथे शिमगोत्सवावरून दोन गटात वाद उफाळून आला आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील 9 जणांविरोधात मंगळवारी संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद पोलिस पाटील विलास राऊत यांनी दिली आहे. सन 2020 मध्ये राजवाडी ग्रामपंचायत निवडणुकीवेळी उमेदवार उभे करण्यावरून गावात वाद झालेला होता. त्यावरून गावात दोन गट निर्माण झालेले आहेत. वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांतील ग्रामस्थांना वेळोवेळी शिमगोत्सवाच्या अनुषंगाने संगमेश्वर पोलिसांनी गावास भेटी देऊन बैठक घेऊन शिमगोत्सव शांततेत पार पडण्याबाबत आवाहन करण्यात आलेले होते. 12 मार्च रोजी दुपारी 11.55 वा यातील गावप्रमुख कृष्णा शंकर सुर्वे, सिताराम गोपाळ बाईत, जयराम बाबू गुरव, नरेश लक्ष्मण शिर्के व इतर गावकरी असे राजवाडी सुर्वेवाडी येथे केदारनाथ ग्रामदेवतेची सहाण याठिकाणी शिमगा सण साजरा करीत असताना त्याठिकाणी सुभाष जानू मांजरेकर ( रा . राजवाडी मांजरेकरवाडी), चंद्रकांत राजका भडवलकर (रा . राजवाडी भडवलकरवाडी), प्रकाश गोविंद खांबे (रा. राजवाडी ब्राम्हणवाडी , विजय अर्जुन सुर्वे ( रा . राजवाडी सुर्वेवाडी) , दिलीप मधुकर गुरव (रा . राजवाडी गुरववाडी) पारंपरिक होळी सणाचा धार्मिक कार्यक्रम चालू असताना तेथे गेले. कार्यक्रम चालू ठेवणे व बंद करण्याच्या उद्देशाने 9 जणांनी गैरकायदा जमाव करून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत व तावातावाने अंगावर धावत जाऊन पुढे जाण्यासाठी एकमेकांस आडकाठी केली. पोलिस पाटील विलास शांताराम राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 9 जणांवर संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.