देवगड हापूस आता प्लास्टिक क्रेटमधून बाजारात
जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा देवगड हापूस आता प्लास्टिक क्रेटमधून बाजारात जात आहे. याद्वारे आंबा सुरक्षित जाण्याबरोबरच हवा लागत असल्याने फळामध्ये साक्या होण्याचे प्रमाण कमी होईल.पॅकिंग खर्चातही बचत होत असल्याचा बागायतदारांचा अनुभव आहे.
कोकणातील हापूस वाशी बाजारात पाठवताना विविध प्रकारचे पॅकिंग साहित्य वापरले जात असे. सुरुवातीला करंड (लाकडी बांबूपासून बनवलेले) होते. आंबा नाजूक असल्याने वाहतुकीमध्ये सुरक्षितता येण्यासाठी लोखंडी ट्रंकही वापरली जात होती. त्यावेळी काही प्रमाणात लाकडी खोके वापरले जात होते; मात्र ते हाताळणीसाठी वजनदार पडतात. ट्रंकमधून आंबा बाजारात गेल्यावर रिकाम्या ट्रंका माघारी आणल्या जातात. त्या परत आणण्याचे किरकोळ भाडे आकारले जाते; मात्र ट्रंकाची एकूणच किंमत आणि काही प्रमाणात ट्रंका गहाळ होत असल्याचे चित्र होते. त्यानंतर पॅकिंगसाठी पुठ्ठा बॉक्स वापरात आले. एकदा पाठवलेले बॉक्स परत आणला जात
नसल्याने आंबा पार्सलचे एकेरी भाडे बागायतदारांना परवडते; मात्र ट्रकमध्ये आंबा भरल्यानंतर एकावर एक पार्सल भरल्यावर काही प्रमाणात बॉक्स दबतात. त्याने आंब्याला धोका पोहोचण्याचा संभव असतो. आता पॅकिंगसाठी प्लॉस्टिक क्रेट्चा वापर होत आहे. मोठे बागायतदार चांगल्या दर्जाचे क्रेट वापरत असल्याने पॅकिंगवेळी अडचणी भासत नाहीत. क्रेटमध्ये आंबा सुरक्षित भरला जातो. ट्रकमध्ये एकावर एक क्रेट ठेवल्याने फळांना नुकसान पोहोचत नाही. क्रेट चारही बाजूने हवेशीर असल्याने आतील फळांचे तापमान वाढत नाही. अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे आंब्यामध्ये होणारे साक्याचे प्रमाण कमी होऊ शकेल, असा अंदाज आहे.
www.konkantoday.com