काजरघाटीच्या शिमगोत्सवाला सोमवारपासून सुरवात
रत्नागिरी : शहराजवळील काजरघाटी (पोमेंडी खुर्द) येथील ग्रामदेवता महालक्ष्मी, महाकाली, व्याघ्रांबरी देवीच्या शिमगोत्सवाला उद्यापासून (ता. १४) प्रारंभ होणार आहे. उद्या देवीला रूपं लागणार आहेत. त्यानंतर होळी तुटणार आहे. मंगळवारी १५ मार्चला शहरातील खडपे वठार येथील जितू शेट्ये यांच्याकडे होळी आणण्यासाठी पालखी येणार आहे.
बुधवारी १६ मार्चला दुपारी १ वाजेपर्यंत श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात होळी उभी राहणार आहे. त्यानंतर १६ ते १९ मार्चदरम्यान पालखी मंदिरात बसणार आहे. या कालावधीत भाविकांना दर्शन घेता येईल. १९ मार्चला दुपारी १२ नंतर श्री रामेश्वरला भेटून शिंपण्याकरिता पालखी रवाना होणार आहे. रविवार २० मार्च ते २५ मार्च या कालावधीत काजरघाटीत पालखी गावभेट घेणार आहे. २६ ते ३० मार्चला संध्याकाळपर्यंत पालखी कुवारबाव, साईनगर, गणेशनगर परिसरात गावभेट घेणार आहे. ३० मार्चला संध्याकाळी ७ नंतर रूपं उतरल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. दरवर्षीप्रमाणे प्रथा, परंपरा सांभाळत हा उत्सव साजरा होणार असल्याची माहिती श्री महालक्ष्मी देवस्थान न्यासाने केले आहे. या उत्सवाकरिता आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत आणि शिमगोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छाही न्यासातर्फे देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, श्री महालक्ष्मी देवस्थान परिसरातील श्री भराडीण देवीच्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय न्यासाने घेतला आहे. शिमग्यानंतर या कामाला सुरवात होणार आहे. याकरिता दानशुरांनी आणि भाविकांनी सढळहस्ते मदत करावी, असे आवाहन न्यासाने केले आहे.