अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे किंजळे तर्फे नातू येथे वीजवाहिन्या तुटल्या.ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला



खेड : गेले दोन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळत असलेल्या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागातला चांगलाच फटका बसला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरावरील पत्रे, कौले उडणे असे प्रकार सुरु असतानाच दुर्गम भागात वसलेल्या किंजळे तर्फे नातू गावाच्या परिसरात वीजवाहिन्या तुटून रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. येथील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वेळेत महावितरण विभागाला माहिती मिळाल्याने मोठा अनर्थ टळला . अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागात आंबा आणि काजू ही पिके देखील धोक्यात आली आहेत.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे गेले दोन तीन दिवस तालुक्याच्या काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत. या दरम्यान तालुक्याच्या दुर्गम भागात वसलेल्या किंजळे तर्फे नातू या भागात वीजवाहिन्या तुटून रस्त्यावर पडल्या. रस्त्यावर पडलेल्या विद्युतभारित वीजवाहिन्या वेळेत लक्षात नसत्या तर अनर्थ ओढविण्याची शक्यता नाकारता येत नव्हती मात्र या गावातील जागरूक नागरिकांच्या निदर्शनास येताच रस्त्यावर पडलेल्या वीजवाहिन्यांना कोणाचाही स्पर्श होणार नाही याची खबरदारी घेतल्याने अनर्थ टळला.
अवकाळी पाऊस पडून गेल्यानंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या ग्रामस्थांना रस्त्यावर वीजवाहिन्या तुटून पडल्याचे निदर्शनास आले. या ग्रामस्थांनी तात्काळ मोबाईल द्वारे संबधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे ग्रामस्थानी ज्या ठिकाणी नेटवर्क आहे तिथे जाऊन मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते नितीन जाधव यांच्याशी संपर्क साधला. नितीन जाधव यांनी महावितरणचे अभियंता बेडेकर यांच्याशी संपर्क साधुन या बाबतची माहिती दिल्यावर महावितरणचे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तुटलेल्या वीजवाहिन्या जोडून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. किंजळे तर्फे नातू येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे तुलेलेल्या वीजवाहिन्यांमुळे निर्माण होणार संभाव्य धोका टळला
अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू या दोन्ही नगदी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वर्षी आधीच आंभ्याचा मोहोर उशीराने आला आहे. आता कुठे कैरी धरायला सुरवर झाली असतानाच अवकाळी पाऊस कोसळायला सुरवात झाली असल्याने आंबा आणि काजूचाही मोहर गळू लागला आहे. त्यामुळे या वर्षीही कोकणाचा हापूस संकटात सापडला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button