सावित्री नदीवरील कोसळलेल्या पुलाशेजारील दुसऱ्या पुलावरून वाहतूक सुरू, 165 दिवसांत पहिला नवीन पुल उभारल्यानंतर दुसऱ्या पुलासाठी पाच वर्षे!

चुकीच्या दिशादर्शक फलकामुळे भोरकडे जातात मंडणगडची प्रवासी वाहने

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड आणि पोलादपूरदरम्यानच्या महाड एमआयडीसीलगतच्या सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुल 2 ऑगस्ट 2016 च्या मध्यरात्री कोसळल्यानंतर त्याठिकाणी केवळ 165 दिवसांमध्ये उभारण्यात आलेला पहिला नवीन पुल वाहतुकीसाठी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आल्यानंतर दुसऱ्या पुलाचे काम पूर्ण होऊन पहिल्या पुलाच्या उदघाटनप्रसंगाला तब्बल पाच वर्ष झाल्यानंतर कोणत्याही उदघाटनाविनाच वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलावरून उतरताना कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांना भोरच्या दिशेनेच मंडणगड असल्याचे दर्शविणारा चुकीचा फलक लावण्यात आल्यामुळे मंडणगडच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी वाहनांना भोरच्या दिशेने जाऊन पुन्हा राजेवाडीमार्गे मंडणगडकडे जाण्याच्या उलटा प्रवास करावा लागत आहे.

महाड आणि पोलादपूरदरम्यानच्या सावित्री नदीवरील ब्रिटीश कालीन पुल कोसळल्यानंतर केवळ 165 दिवसांमध्ये उभारण्यात यश आल्याने केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी 5 जून 2017 रोजी पहिल्या नवीन सावित्री पुलाच्या या लोकार्पणासोबतच महाड ते छत्रपती शिवरायांच्या राजधानी रायगड रस्त्याचे चौपदरीकरण, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगांव आंबडवेपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पुढील कामांचा शुभारंभ अशा तीन कामांची नियोजनबध्द कालावधीत पूर्तता करण्याची ग्वाही देऊन पनवेल ते इंदापूरपर्यंतचे पहिल्या टप्प्यातील काम का रखडले येत्या 2 महिन्यांमध्ये चौपदरीकरणाचे भूसंपादन करून दिल्यास डिसेंबर 2018 अखेरीस मुंबई ते गोवा हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करून हा प्रवास केवळ 6 ते 8 तासांत करण्याचा शब्द याठिकाणी देऊन ना.गडकरी यांनी दिला होता.

गेल्या पाच वर्षांत पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या कामात नागोठणेलगतच्या कोलेटीपर्यंत आणि अन्य काही गावांमध्ये रखडलेल्या भुसंपादनास आजमितीस कोणत्याही प्रकारची गती मिळाली नसून दुसऱ्या टप्प्यातील कामाची पूर्तता डिसेंबर 2018 मध्ये होण्याऐवजी आता 2022 उजाडूनदेखील येत्या 2-3 वर्षांमध्ये हे काम पूर्णत्वास जाण्याऐवजी ठेकेदाराकडून अर्ध्यावर टाकून पळ काढण्याची ठेकेदाराची मानसिकता दिसून येत आहे. महाड ते छत्रपती शिवरायांच्या राजधानी रायगड रस्त्याचे चौपदरीकरण, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगांव आंबडवेपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण या दोन्ही कामांमध्ये चौपदरीकरणबाधितांना मोबदला देण्याचे काम रखडले असून दापोली मंडणगडच्या बाधितांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंबडवेपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण भुसंपादनाच्या मोबदल्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले आहे.

महाड आणि पोलादपूरदरम्यानच्या सावित्री नदीवरील दुसऱ्या पुलाचा कोणताही गाजावाजा न करता वाहतुकीसाठी वापर सुरू करण्यात आला असून पहिल्या पुलाच्या कामाची थोडीशी डागडुजी सुरू करण्यात आली आहे. आगामी शिमगोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरून सुखकर होण्यासाठी महामार्ग बांधकाम विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या दुसऱ्या नवीन पुलावरून पोलादपूरच्या दिशेला उतरणाऱ्या वाहनांना दिशादर्शक फलकावर कोकणात जाण्यासाठी भोरच्या दिशेने मंडणगड असल्याचे दाखविण्यात आले आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाहने भोरच्या दिशेने चुकून जातात आणि त्यानंतर तब्बल 10 किमी.अंतरावर वरंध घाट सुरू झाल्यावर पुन्हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर परत येऊन राजेवाडी मार्गे मंडणगडला जात असल्याने प्रवासी वाहनांना मनस्ताप दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button