
औद्योगिक वसाहत कारखान्यातील मालाची ने-आण करण्यासाठी कोकण रेल्वेची कंटेनर सुविधा,कोकण रेल्वेचे ऑपरेशन आणि कमर्शिअल संचालक संतोष कुमार झा यांची माहिती
खेड : कोकणातील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांसाठी लागणारा कच्चा माल आणि कारखान्यात तयार होणाऱ्या मालाची वाहतूक करण्यासाठी कोकण रेल्वेने कंटेनर सुविधा सुरु करण्याच्या निर्णय घेतला असून या स्वस्त, जलद आणि खात्रीलायक सुविधेंचा येथील कारखानदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोकण रेल्वेचे ऑपरेशन आणि कमर्शिअल संचालक संतोष कुमार झा यांनी केले आहे. आवाशी येथील आंब्रे फार्महाऊस येथे सीसा लॉजिस्टिक या कंपनी चे विक्रांत आंब्रे यांनी वतीने लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे प्रतिनिधी आणि कोकण रेल्वे अधिकारी यांच्यामध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले होतेया चर्चासत्रादरम्यान संतोष कुमार झा बोलत होते.
बोलताना ते म्हणाले, कोकण रेल्वे मार्गावर इंडस्ट्रियल मालाची वाहतूक करण्याची सुविधा अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे इंडस्ट्रियल मालाची वाहतूक ही रोड वाहुतकीद्वारेच करावी लागते. यामध्ये वेळ आणि पैश्याचा अपव्यय होतो. इंडस्ट्रियल मालाची वाहतूक, जलद, सुलभ आणि कमीत कमी खर्चात व्हावी यासाठी कोकण रेल्वे मार्गावर आता कंटेनर सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील एका कारखानाचा कच्चा माल कोकण रेल्वे कंटेनर द्वारे आणण्यास प्रायोगिक तत्वावर सुरवात करण्यात आली आहे. सिद्धराम विक्रांत आंब्रे यांची सीसा लॉजिस्टिक ही कंपनी हे काम करत आहे. खेड रेल्वे स्थानकांवर कंटेनरमधील माल उतरवुन तो बायरोड आवाशी येथील वेअरहाऊस आणि तिथून तो संबंधित कंपनीत पोहचवला जातो. प्रायोगिक तत्वावर सुरु केलेली ही सुविधा यशस्वी होताना दिसत आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांचे सहकार्य मिळाले तर कोकण रेल्वे मालाची ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कंटेनर सुविधा सुरु करेल असे आश्वासन कोकण रेल्वेचे ऑपरेशन आणि कमर्शिअल संचालक संतोष कुमार झा यांनी यावेळी दिले.
या चर्चासत्रासाठी उपस्थित असलेल्या कारखाना प्रतिनिधींनी देखील कोकण रेल्वेने देऊ केलेल्या कंटेनर सुविधेचे स्वागत करून यासाठी आमचे सहकार्य राहील असे सांगितले. या चर्चासत्रात कोकण रेल्वेकडून चिफ कमर्शिअल मॅनेजर एल के वर्मा, रिजिनल रेल्वे मॅनेजर रवींद्र कांबळे, रिजिनल ट्राफिक मॅनेजर एच श्रीधर भट आणि वरिष्ठ ट्राफिक मॅनेजर एस के बाळा यांनी सहभाग घेतला.