
रत्नागिरी जिल्ह्यात लोककला पथकांच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रसिध्दी..
रत्नागिरी : शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्ताने शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कलापथकांच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत. ९ मार्च रोजी रत्नागिरी जिल्ह्यात या मोहिमेचा प्रारंभ झाला आहे. या मोहिमेमध्ये भाकर संस्था लांजा, आधार सेवा ट्रस्ट रत्नागिरी व शाहीर रत्नाकर महाकाळ लोककला मंच, खेड या संस्था लोककलेच्या माध्यमातून जागर करीत आहेत. खेड तालुक्यातील घाणेखुंट, गांधी चौक खेड, भरणा नाका, आवाशी या गावामध्ये तसेच रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव, निवळी, जाकादेवी, कारवांची वाडी, गणपतीपुळे या आणि राजापूर तालुक्यातील राजापूर बस स्टँड, राजापूर बाजारपेठ अशा विविध ठिकाणी कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. याद्वारे महिला आरक्षण, शेतकरी पिक विमा, निरंतर शिक्षण, बंदर विकास अशा विविध योजनांची माहिती कलापथकाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या या लोकजागराचा नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.