रत्नागिरीतील ‘अखिल चित्पावन’च्या ‘कट्यार’ने राज्य संगीत नाट्य स्पर्धेला प्रारंभ
रत्नागिरी : रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहा. मंडळाच्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने संगीत राज्य नाट्य स्पर्धेचा पडदा उघडला. 60 व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य
स्पर्धेच्या अंतिम फेरीला गुरुवारपासून रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात सुरुवात झाली.पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून साकारलेले कट्यार काळजात घुसली हे नाटक म्हणजे सर्वाधिक लोकप्रियता लाभलेलं नाटक आहे. प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादात हे नाटक उत्तरोत्तर रंगत गेले. यातील कलाकार उमा (सायली मुळ्ये), बद्रीप्रसाद (वामन जोग), दिवाणजी (अनिकेत आपटे), बाकेबिहारी (संतोष दामले), चाँद (कौस्तुभ सरदेसाई), उस्मान (साईश प्रभूदेसाई), झरीना (मनाली जोशी), छोटा सदाशिव (सूर्याक्ष रेमणे), पंडित भानूशंकर (राम तांबे), सदाशिव (श्रीधर पाटणकर), उस्ताद खाँसाहेब (स्वानंद भुसारी) यांनी लक्षवेधी अभिनय केला आहे. गायनाची बाजूही चांगली होती. वामन जोग यांचे दिग्दर्शक, राम तांबे, संध्या सुर्वे यांचे संगीत मार्गदर्शन कलाकारांसाठी मोलाचे ठरले. वैभव फणसळकर यांची ऑर्गनसाथ, निखिल रानडे यांची तबला साथ, प्रसाद लोगडे यांचे नेपथ्य आणि रंगभूषा, प्राजक्ता जोशी आणि अर्चना जोशी यांची वेशभूषा, मंगेश लाकडे यांची प्रकाश योजना, रामदास मोरे यांचे पार्श्वसंगीत सारेच अप्रतिम होते.