महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकतं -काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांचे मत

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालामध्ये पंजाबवगळता उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये भाजपाने जोरदार कामगिरी करत चार राज्यांमध्येै सत्ता स्थापनेची तयारी सुरु केलीय. एकीकडे या चार राज्यांमध्ये भाजपाचं सरकार येणार हे निश्चित झालेलं असतानाच दुसरीकडे राज्यामधील महाविकास आघाडी सरकारबद्दल पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. निकालाच्या दिवशीच भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी युपी तो सिर्फ झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, अशी प्रतिक्रिया दिलीय. तर राज्यातील सरकार अस्थिर होईल का याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं असं म्हटलंय.
पाच राज्यांमधील निवडणुकांच्या निकालानंतर गुरुवारी सायंकाळी बीबीसी मराठीशी बोलताना कुमार केतकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. कुमार केतकर आणि भाजपाचे खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाग घेतलेल्या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर या निवडणुकीच्या निकालांचा काय परिणाम होईल यासंदर्भात चर्चा झाली त्यावेळीच केतकर यांनी हे वक्तव्य केलं.
“सरकार पाडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का?,” असा प्रश्न जावडेकारांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “आम्ही पाडायचं काय प्रयत्न करतोय? शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये असंतोष असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना कागदावर बहुमत आहे, विधानसभेत बहुमत आहे त्यांचं त्यांचं चालूय. आम्ही काय केलं पाडायला?,” असा प्रतिप्रश्न केला. यावर “केंद्रीय संस्था पाठवल्याचा आरोप शिवसेनेनं केला” असा संदर्भ देण्यात आला. त्यावरही उत्तर देताना जावडेकरांनी, “त्याचा काय संबंध. तुमच्याकडे केंद्रीय संस्था पाठवल्या तरी तुम्ही तुमचं पत्राकिरतेचं काम करत राहाल. कर नाही त्याला डर कशाला? काहीतरी केलं असेल तर माणूस घाबरेल. खरी माहिती देत असाल तर धाड कशाला पडेल,” असं उत्तर दिलं.
सरकारला धोका आहे का? असा थेट प्रश्न कुमार केतकर यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना कुमार केतकर यांनी, “सरकारला धोका स्थापन झाल्यापासून आहे. ईडीवगैरे ते चालवतात. आता नारायण राणे त्यांच्याकडे आले. पण सगळ्या भाजपा नेत्यांची नारायण राणेंविरोधातील भाषणं युट्यूबवर उपलब्ध आहेत. ते भाजपात आल्याबरोबर त्याच्याबद्दलची चर्चा थांबली. मुद्दा असा की जर त्यांना सरकार पाडयचं असेल तर यंत्रणा कशा वापरायच्या हे त्यांना माहितीय,” असं केतकर म्हणाले.
मुलाखतीमध्ये याच प्रश्नाला उत्तर देताना केतकर यांनी, “महाराष्ट्राचं सरकार कोणत्याही क्षणी जायला तयार आहे. त्यांनी मिशन कमळ काढलं तर जातील” असं म्हटलं. यावर, “तुम्ही खूप मोठं विधान करतायत,” असं केतकर यांना मुलाखतकाराने सांगितलं. त्यावर, “महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून मी हेच सांगतोय. तीन पक्षांचा सरकार आहे. ते वेगवेगळ्या यंत्रणा वापरत नाहीयत. महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही क्षणी जाऊ शकेल. म्हणजे आपण आत्ता बोलतोय ना तिकडे सरकारला सुरुंग लावण्याची तयारी सुरु झालेली असेल,” असं म्हणत कुमार केतकर यांनी महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार कधीही पडेल या आपल्या विधानावर ठाम असल्याचं सूचित केलं.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button