दापोली तालुक्यात शेतकऱ्यांचा ड्रॅगन फ्रुटचा प्रयोग
दापोली : तालुक्यातील दमामे – तामोंड येथे शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटची शेती केली आहे. शेतकरी सुरज कांदेकर आणि त्यांचे वडील सुरेश कांदेकर यांनी एकूण ४५० रोपांची लागवड केली आहे. ड्रॅगन फ्रुटची रोपे आता जोम धरू लागली असून काही दिवसात त्यांना कळ्या येण्यास सुरुवात होईल, असे शेतकरी सांगत आहेत. कृषी क्षेत्राशी काही संबंधित लोकांकडून त्यांनी माहिती मिळवली. पंढरपूरमधील एका नर्सरी मधून त्यांनी ही रोपं मागवली आणि लागवड केली. त्यासाठी त्यांनी शेतीत १२ बाय ८ अंतरावर खड्डे खोदून सीमेंट पोल रोवले. त्या पोलच्या भोवती मातीचे बेड तयार करून, एका पोल भोवती 4 रोप या पद्धतीनं लागवड केली. कांदेकर यांनी या पिकाला सेंद्रीय खत वापरलं, जेणेकरून फळाचं चांगलं पोषण झालं पाहिजे. यासाठी कांदेकर यांना येथील सरपंच गंगाराम हरावडे आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत २ लाखांपर्यंत खर्च झाला आहे. जी मेहनत आम्ही घेतली आहे, त्यात नक्की यश मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
हे फळ दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असल्याने लोकांमध्ये त्याची फार उत्सुकताआहे. ड्रॅगन फळाचे शास्त्रीय नाव हायलोसीरीयस अंडाटस असून कॅक्टस कोरफड वर्गातील ही वनस्पती आहे. ड्रॅगन फ्रूट शरीरासाठीही खूप लाभदायक आहे. यामुळेच याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणूनही याचा वापर करण्यात येतो. सामान्यतः ड्रॅगन फ्रुट थायलंड, व्हिएतनाम, इस्राईल आणि श्रीलंकेमध्ये लोकप्रिय आहे. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते त्यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका होते. तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत करण्यासाठीही मदत होते.
ड्रॅगन फ्रूट हे भारतीय शेतकऱ्यांसाठी आश्वासक फळपीक झाले आहे. मूख्यत: मध्य अमेरिकेपासून ते थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, बांगलादेश आदी ठिकाणी ते यशस्वीरीत्या व्यापारी पीक म्हणून घेतले जाते. आता ते भारतातही येऊन पोचले आहे. ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती आहे. हायलोसेरेयस ही त्याची प्रजाती आहे. याच्या जातींमध्ये विविधता आढळते. वरून लाल रंग आतील गर पांढरा, वरून लाल रंग आतील गर लाल व वरून रंग पिवळा व आतील गर पांढरा अशा तीन तीन प्रकारांत हे फळ येते. ड्रॅगनफ्रूटला आशियाई देशांत पिताहाया किंवा पिताया या नावानेही संबोधले जाते.