संजीव कबीर यांना पितृशोक कबीर अकॅडमी,’सारस्वत मित्र’चे व्यवस्थापक एमजी कबीर यांचे निधन
रत्नागिरी/- लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणारी ‘कबीर अकॅडमी’ आणि ‘सारस्वत मित्र’ मासिक यांचे व्यवस्थापक मोहन गणेश तथा एमजी कबीर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते सत्तर वर्षांचे होते. नवी दिल्लीत ‘करिअर क्वेस्ट’ या ‘आयएएस’चे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे संस्थापक आणि संचालक संजीव कबीर यांचे एमजी कबीर हे वडील होत. त्यांच्यामागे पत्नी, संजीव व विद्युत अभियंता तुषार हे दोन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
प्राथमिक शिक्षक म्हणून विल्ये (ता. रत्नागिरी) येथील शाळेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर श्री. कबीर हे संजीव कबीर यांनी सुरू केलेल्या मासिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग या उपक्रमांचे व्यवस्थापन पहात असत. एक मध्यमवर्गीय सेवानिवृत्त शिक्षक असूनही आपला मोठा मुलगा संजीव याला लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे प्रशिक्षण घेण्यासाठी दिल्ली येथे ठेवण्याचा त्यांचा चाकोरीबाहेरचा निर्णय हा कौतुकाचा विषय झाला होता. विनम्र, मनमिळावू आणि स्वागतशील स्वभावामुळे त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. सततच्या परिश्रमाने त्यांनी या दोन्ही संस्थांना जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही प्रतिष्ठा मिळवून दिली. गेल्या आठवड्यात प्रकृती ढासळल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू केले होते, बुधवारी पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
‘श्री. कबीर यांच्या निधनाने रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण उपक्रमांचे मोठे नुकसान झाले आहे,’ अशा शब्दांत मुंबई विद्यापीठाच्या पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी दुःख व्यक्त केले. जिल्हा पेन्शनर संघटना आणि स्वतंत्र कोंकण चळवळीचे ज्येष्ठ पदाधिकारी गोठिवरेकर गुरुजी यांनी ‘एक अत्यंत सालस व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले’ अशा शब्दांत आपल्या भावना प्रकट केल्या.
www.konkantoday.com