
आंबा घाटात भीषण अपघात २ महिन्याच्या बाळासह एका महिलेचा जागीच मृत्यू तर तिघांची प्रकृती चिंताजनक ,बांधकाम खात्याच्या बेपर्वाईमुळे अपघात
रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील गायमुख जवळ सांगली वरून गणपतीपुळे येथे निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घातला या अपघातात दोन महिन्यांच्या बाळासह एका महिलेचा मृत्यू झाला तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत .
रस्त्याचा अंदाज न आल्याने कठडा नसल्यामुळे KA 32 Z 0949 क्रमांकाची किया सँल्टोस गाडी खोल दरीत गेली.
घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस स्थानकाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्याचप्रमाणे साखरपा व आंबा येथील स्थानिक तरुण मदतीसाठी पुढे सरसावले.खोल दरी व जंगल असल्यामुळे मदतकार्यात अडथळा येत होता.मात्र मोठ्या जिद्दीने खोल दरीत गाडी कोसळलेल्या ठिकाणी हे तरुण पोहचले.यावेळी शिवांश हरकुडे (२ महिने),सृष्टी संतोष हरकुडे(३२) यांचा जागीच मृत्यू झाला.यावेळी २ महिनाच्या बाळाचा मृतदेह पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली. या अपघातात संतोष हरकुडे,दीप्ती फुलारे,प्रताप तपस्ते,रेयान सुभेदार, आद्या फुळारे,तन्मिना हरकुडे हे सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.१०८ ॲम्बुलन्स,नरेंद्र महाराज संस्थान ॲम्बुलन्स घटनास्थळी बचावकार्यात मदत करत होत्या.
यावेळी जय शिवराय मित्रमंडळ साखरपा,राजू काकडे हेल्प अँकॅडमी,आंबा घाटातील स्थानिक नागरिक यांनी बचावकार्यात केलेल्या धाडसाचे कौतुक करण्यात आले.यावेळी वैभव भोसले,बाबू चव्हाण, अक्षय महाडिक, संजय जांगळी, रवी फोंडे, मंगेश फोंडे ,प्रमोद माळी, सुनील काळे ,अविनाश कांबळे ,वैभव डौर,शुभम पाटील राजू काकडे हेल्प अँकॅडमी देवरुख चे राजा गायकवाड,सिद्देश वेल्हाळ,दिलीप गुरव, चंद्रकांत भोसले आदींनी या रेस्क्यु मध्ये मेहनत घेतली.
घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलीस स्थानकाचे निरीक्षक बाळकृष्ण जाधव,पोलीस उप निरीक्षका विद्या पाटील, अंमलदार संजय मारळकर,अर्पिता दुधाने,सचिन भुजबळराव, किशोर जोयशी,वैभव कांबळे यांनी मदतकार्यात महत्वाची भूमिका घेतली. त्याचप्रमाणे घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार सुहास थोरात यांनी घटनास्थळी पाहणी केली.
अपघातग्रस्त झालेले कुटुंबीय सांगली विश्राम बाग येथील होते. देवदर्शनासाठी गणपतीपुळे या ठिकाणी निघाले होते.मात्र वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला.
या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे अपघात घडला असल्याचा संताप स्थानिकांनी व्यक्त केला.याच ठिकाणी काही महिन्यापूर्वी स्विफ्ट गाडीचा अपघात घडला होता यामध्ये एका वृद्धाला यात जीव गमवावा लागला होता.मात्र त्यावेळी पोलीस विभाग यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले.मात्र यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
www.konkantoday.com