शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत विजेचा शाॅक लागून, होरपळून बालकाचा मृत्यू
कुडाळ : अभ्यास करीत असताना शाॅर्ट सर्किटमुळे विजेचा शाॅक लागल्याने तसेच यावेळी लागलेल्या आगीत बालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना वालावल आदोसेवाडी येथे घडली. इयत्ता नववीतील रितेश रवींद्र मार्गी (वय 15) याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी रितेशच्या खोलीतील सर्व साहित्यही जळून खाक झाले व स्फोट सदृश आवाजही झाला होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वालावल आदोसेवाडी येथील रितेश रवींद्र मार्गी (वय 15) हा चेंदवण हायस्कूल येथे नववीत शिकत होता. बुधवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास तो हायस्कूलमधून घरी आला. घराच्या वरच्या मजल्यावर त्याच्या अभ्यासाच्या खोलीत गेला. काही वेळाने या खोलीतून धुराचे लोट व स्फोटाचा मोठा आवाज आला. तसेच यावेळी शेतात काम करणारे त्याचे वडील व शेजारी यांनी रितेशच्या रूमकडे धाव घेत रूम उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे दरवाजा तोडण्यात आल्यावर रूममधील टिव्ही, चादरी तसेच इतर सर्व साहित्याला आग लागली होती व सर्वत्र धुराचे साम्राज्य होते. तर ज्या बेडवर रितेश होता त्याच ठिकाणी तो जळालेल्या अवस्थेत निपचित पडला होता. त्याचा बिछान्याला आग लागल्यामुळे त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला.
घटनास्थळी यावेळी सरपंच, पोलिस पाटील, निवती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वारंग तसेच इतर पोलिसांनी जाऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात शाॅर्ट सर्किटमुळे विजेचा शाॅक लागून त्याचा मृत्यू झाला व याच शाॅर्ट सर्किटमुळे या ठिकाणी आग लागल्याचे सांगण्यात आले. मयत रितेशच्या पश्चात वडील, आई, बहीण व आजी असा परिवार आहे.