पत्नीचे अश्लिल व्हीडीओ व्हायरल होण्याच्या भीतीने धमकी देणाऱ्यालाच त्याने संपवले
राजापूर रानतळे घातपात प्रकरणातील आरोपीची कबुली; पोलिसांनी अल्पावधीतच लावला छडा
राजापूर : तुझ्या पत्नीचे अश्लिल व्हीडीओ माझ्या मोबाईलमध्ये आहेत. 30 हजार रूपये दे, अन्यथा मी ते व्हीडीओ व्हायरल करेन’ अशी धमकी दिल्याच्या रागातून डोक्यात दगड घालून ठार केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. राजापूर तालुक्यात रानतळे येथे घडलेल्या हत्याकांडाचा छडा पोलिसांनी अल्पावधीतच लावला आहे.
मंगळवारी सायंकाळी रानतळे पिकनिक स्पॉटपासून काही अंतरावर धोपेश्वर गुरववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून सुमारे 50 मीटर अंतरावर सड्यावर मृतदेह आढळून आला होता.
शहरातील रानतळे येथील सड्यावर संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या राजेश वसंत चव्हाण (वय 40, राहणार चव्हाणवाडी, राजापूर) याच्या खुनाचा अवघ्या बारा तासाच्या आत छडा लावण्यात राजापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी रूकसार उर्फ सलमान मोहमद सलमानी (वय 25, रा. उत्तरपदेश, सध्या राजापूर) याला अटक केली होती. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली आहे. राजेश याच्या डोक्यावर गंभीर जखमा असल्याने त्याचा घातपात झाल्याचा अंदाज व्यक्त होत होता. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरविली.
रूकसार उर्फ सलमान मोहमद सलमानी याला बुधवारी सकाळी ताब्यात घेतले. त्याला पोलिस खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती परबकर यांनी दिली. रूकसार हा राजापूर शहरातील एका सलूनमध्ये कामाला आहे. त्यावेळी राजेश चव्हाणने धमकी देत पैशांची मागणी केली. याचा राग मनात धरून रूकसार याने सोमवारी सायंकाळी राजेश याला रानतळे येथे नेले. त्याठिकाणी राजेश याने दारू प्यायल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार केल्याचे पोलीस जबाबात रुकसारने सांगितले.
राजापूर पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे, श्रीम.वेंगुर्लेकर यांच्यासह सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी तपासकामी मेहनत घेतली.