रत्नागिरीतील तारांगणाचे काम अंतिम टप्प्यात
रत्नागिरी
अत्याधुनिक थ्रीडी यंत्रणेचा वापर करून अवकाशात सैर करण्याचा अनुभव घेता यावा यासाठी रत्नागिरी शहरात माळनाका येथे तारांगण उभारण्यात येत आहे. १२०० चौरसमीटर क्षेत्रावरही उभारण्यात येणार्या या वास्तूचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एकावेळी ६५ व्यक्तींना याचा लाभ घेता येईल. या व्यतिरिक्त विज्ञान व प्रशिक्षण प्रदर्शन सभागृह, अतिमहनीय व्यक्तींकरता कक्ष, सुसज्ज सभागृह, खुले थिएटर, प्रत्यक्ष प्रक्षेपण सभागृह, विज्ञानप्रदर्शन व मनोरंजन सभागृह आदी सुविधांसाठीचे नियोजन केले गेले आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यात होणाऱ्या तारांगणाच्या रूपाने जिल्ह्यातीलच नव्हे तर कोकणातील मुलांना व पर्यटकांना पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमधील खगोलशास्त्राच्या कुतुहलात वाढ व्हावी आणि अवकाशातील रोचक गोष्टींची माहिती व्हावी, या उद्देशाने अत्याधुनिक थ्रीडी प्रक्षेपण यंत्रणा डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित बसवण्यात येणार आहे. त्यासाठी खास अमेरिकेतून उपकरणे मागवली असून येत्या काही दिवसात ती बसवली जाणार आहेत. त्यामुळे रत्नागिरीकरांसह पर्यटकांना आता खगोलविश्वाची सफर घडू शकेल. अवकाशात असलेल्या ग्रहतार्यांची रचना, ग्रहणांसारख्या घटना या ठिकाणी पाहता येतील. ही माहिती दृकश्राव्य माध्यमातून प्रभावीपणे मांडली जाणार आहे. इन्फोव्हिजन या कंपनीमार्फत येथील यंत्रणा बसवण्याचे काम चालू आहे. येथील तज्ञ सदस्यांच्या पथकाने तारांगण, खगोलशास्त्र, दृकश्राव्य इंटिग्रेशन, थ्रीडी अॅनिमेशन आणि ग्राफिक्स, मोठ्या स्क्रीन डिस्प्ले किंवा आर्किटेक्चर या क्षेत्रातील काम केले आहे. मोबाईल तारांगण शो आयोजित करणे, टेलिस्कोप आणि वेधशाळा सेटअप् बसवणे, दृकश्राव्य यंत्रणा बसवणे, प्रकाशनियंत्रण प्रणाली ही कामे केली जाणार आहेत.
तारांगणाविषयी काही ठळक बाबी
- थ्रीडी अॅक्टिव्ह सिस्टीमचे महाराष्ट्रातील पहिले
- लाइव्ह टेलिस्कोप यंत्रणेद्वारे खगोलविश्वदर्शन
- हबलसारख्या मोठ्या दुर्बिणींशी तारांगण जोडलेले
- अन्य तारांगणातील माहिती ऐकण्याची सुविधा
- भारतातील सात तारांगणांशी राहणार जोडलेले
- चंद्र, मंगळ पुनोरमा दालनांद्वारे ग्रहांचा आभास
- अॅस्ट्रॉनामी गॅलरी, टेरेस टेलिस्कोपचाही आनंद
- अक्षांश-रेखांशानुसार नक्षत्रांची अनुभूती तारखेनुसार विस्तृत माहितीचे भांडार
www.konkantoday.com