
हुरा रे हुरा आमच्या गावदेवीचा सोन्याचा तुरा रे…होलियो !जिल्ह्यात शिमगोत्सवाला आजपासून प्रारंभ
हुरा रे हुरा आमच्या गावदेवीचा सोन्याचा तुरा रे…होलियो अशा फाका देत जिल्ह्यातील महत्वाच्या शिमगा सणाला सोमवारी प्रारंभ झाला आहे. फाल्गुन पंचमी म्हणजेच फाक पंचमीपासून होळी उत्सवास सुरुवात झाली आहे. रत्नागिरीच्या भैरी देवस्थानची बैठक नुकतीच झाली. यात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
पारंपरिक पध्दतीने होळीचे पूजन करून या उत्सवाची सुरूवात होणार आहे. सुमारे १५ दिवस चालणाऱ्या या सणात होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा आदी विविध उत्सव साजरे केले जाणार आहेत. रविवारी शिमगोत्सवासाठी होळी आणताना मोठा उत्साह होता. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पहिल्या होळीच्या दिवशी शेवरीचे झाड तोडून त्याची होळी उभी केली जाते. या होळीची पुढील १० ते १२ दिवस पूजा, आरती करून ती पेटवण्यात येते. शेवटची होळी म्हणजे होम पेटवण्याची प्रथा आहे. विविध गावांमध्ये शिमगोत्सवात वेगवेगळ्या प्रथा आहेत. या उत्सवात होळी पेटवण्यासाठी उत्साह दांडगा असतो. आपापसातील भांडण-तंटे मिटवून या सणात ग्रामस्थ एकत्र येत असतात. विविध गावांमधील खेळे हे देखील प्रमुख आकर्षण असते. गावागावातील फिरणारे संकासूर मनोरंजन करतो. या कालावधीतच उन्हाचा तडाखा वाढत असताना देखील प्रथा, परंपरा जपण्यासाठी गावागावातील खेळे अनवाणी फिरत असतात. आपल्या ग्रामदेवतेचे चिंतन हेच या प्रथा जपण्यास आपल्याला बळ देते, असे ग्रामस्थ सांगतात. होमात नवीन जोडप्यांनी नारळ टाकून पुढील संसारासाठी आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. सहाण भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गावागावांमधील ग्रामदेवतांच्या पालख्या घरोघरी फिरवल्या जातात. या पालख्यांच्या पारंपरिक ठरलेल्या हद्दीत त्या फिरवल्या जातात. या कालावधीत मुंबई, पुणे येथे नोकरीसाठी असलेले चाकरमानी गावांमध्ये येतात.