रत्नागिरीत महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस
सोमेश्वर गावात प्रकार: नशेची गोळी देऊन वारंवार अत्याचार, मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन अतिप्रसंग
रत्नागिरी : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेला दुधातून नशेची गोळी देऊन तो तिच्यावर अतिप्रसंग करायचा. तसेच मोबाईलवर वारंवार अश्लिल व्हिडीओ पाठवायचा. मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार केले. या लैंगिक अत्याचाराला कंटाळून तिने पोलिस ठाणे गाठले. फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तो रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर गावात.
मुबीन इस्माईल सोलकर (राहणार सोमेश्वर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडीतेने तक्रार दिली आहे. पोलिस ठाण्यातून दिलेल्या तक्रारीनुसार, 2014 मध्ये त्याने या पीडित महिलेचा विनयभंग केला होता. तेव्हा हा प्रकार कोणाला सांगितलास तर ठार मारण्याची धमकी दिली होती. सन 2015 मध्ये सोलकरने तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर वारंवार तो पीडितेला दुधातून नशेची गोळी देऊन तिच्यावर अतिप्रसंग करत होता. मोबाईलवर वारंवार अश्लिल व्हिडीओ पाठवायचा. 3 मार्च 2022 रोजी रात्री 9.45 वा.च्या सुमारास पीडित महिलेची मुले घराबाहेर असल्याने त्यांना बोलावण्यासाठी ती घरातून बाहेर गेली. यावेळी संशयिताने पीडितेवर जबरदस्ती केली. या प्रकाराला कंटाळून पीडितेने अखेर 4 मार्च रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.