
कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस
रत्नागिरी: चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दोन दिवसात आणखीनच जोर केला असून रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांना व जिल्ह्यातील लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक सुरू असली तरी काही प्रमाणात विस्कळीत झाली असून अनेक गाड्या उशीराने धावत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, खेड, रत्नागिरी, संगमेश्वर, मंडणगड, चिपळूण आदी भागात पावसाचा जोर वाढत आहे. यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. मात्र अजूनही कोणत्याही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. रत्नागिरी तालुक्यातही मुसळधार पाऊस कोसळत असून समुद्रातील वादळी वातावरणामुळे व खवळलेल्या समुद्रामुळे मच्छिमारी ठप्प झाली असून काही मच्छिमार नौकांनी समुद्रात जायचे टाळले आहे. तर जयगड बंदरात सुरक्षिततेच्या कारणावरून मुंबई, रायगडमधील मच्छिमारी नौका आश्रयासाठी आल्या आहेत. चिपळूण तालुक्याला पावसाने झोडपले असून शिवनदी, वाशिष्ठी नदीमधील पाण्यांची पातळी वाढत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास चिपळूण शहराला पुराचा धोका उदभवू शकतो. मंडणगड तालुक्यातही मुसळधार पाऊस कोसळत असून तेथील भारता नदीत पाण्याची पातळी वाढत आहे. संगमेश्वर तालुक्यातही मुसळधार पावसाने शास्त्री, सोनवी, बावनदी आदी नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. खेड तालुक्यातही पावसाचा जोर असल्याने जगबुडी नदीची पातळी अलर्टपर्यंत गेली आहे. राजापूर, कोदवली येथे देखील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. रायगडमधील महाड शहरात काही ठिकाणी पुराचे पाणी शिरल्याचे वृत्त असून सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. सततच्या पावसाने पुंडलिका, सावित्री नदीच्या पाणलोट क्षेत्रात वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला असून रायगड जिल्ह्यात ताम्हणी, माणगांव या घाटात दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याचे वृत्त हाती आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे.