आर्ट सर्कल, रत्नागिरीचा संगीत महोत्सव 11 मार्च ते 13 मार्च रोजी


 
आर्ट सर्कल, रत्नागिरी आयोजित पंधरावा  संगीत महोत्सव यावर्षी दिनांक 11 ते 13 मार्च 2022 रोजी थिबा पॅलेसच्या प्रांगणामध्ये भरणार असून यावर्षी पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दिनिमित्त हा महोत्सव “स्वरभास्कर संगीत महोत्सव” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. रत्नागिरीच्या सांस्कृतिक कलाक्षेत्रामधला मानाचा तुरा असणार्‍या या महोत्सवामध्ये पंडित आनंद भाटे, पंडित राम देशपांडे,  बासरीवादक प्रवीण गोडखिंडी, व्हायोलिनवादक यज्ञेश रायकर, गायिका दिपिका भागवत, ऋतुजा लाड यांसारखे दिग्गज आणि तरूण कलाकारांचे गायन आणि वादन ऐकण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे. या कलाकारांसोबत साथसंगतीला अजय जोगळेकर (संवादिनी), यशवंत वैष्णव, मयंक बेडेकर, सिद्धार्थ पडियार (तबला) यांचे वादनही असणार आहे. 
प्रतिवर्षी हा महोत्सव जानेवारी महिन्याच्या अखेरीला संपन्न होतो, मात्र यावर्षी कोव्हिड निर्बंधांमुळे महोत्सवाचे नियोजन मार्च महिन्यामध्ये करण्यात येत आहे. गेली चौदा वर्षे अखंड सुरू असलेला हा संगीत महोत्सव म्हणजे कोकणामधील संगीत रसिकांसाठी एक मेजवानी असते. दरवर्षी केवळ रत्नागिरीमधूनच नव्हे, तर देशभरामधून अनेक संगीत रसिक या महोत्सवाला भेट देतात. याहीवर्षी रसिकांचा असाच भरघोस प्रतिसाद मिळून हा महोत्सव यशस्वी होईल. 
 महोत्सवाची सुरुवात 11 मार्च 2022 रोजी संध्याकाळी सात वाजता दिपिका भागवत आणि ऋतुजा लाड यांच्या सहगायनाने होईल. त्यांना तबला साथ सिद्धार्थ पडियार तर संवादिनीवर साथ हर्षल काटदरे यांची असेल. यानंतर सुप्रसिद्ध गायक पंडित राम देशपांडे व गंधार देशपांडे यांचे गायन सादर होईल. त्यांना  तबला साथ यशवंत वैष्णव व संवादिनी साथ अजय जोगळेकर करतील. 
महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी 12 मार्च 2022 रोजी सुप्रसिद्ध तरुण गायक नागेश आडगांवकर यांचे गायन होईल. त्यांना तबला साथ मयंक बेडेकर आणि संवादिनी साथ चैतन्य पटवर्धन करतील. यानंतर सुप्रसिद्ध बासरीवादक प्रवीण गोडखिंडी आणि त्यांचे पुत्र व शिष्य षडज गोडखिंडी यांचे बासरीवादन होईल. त्यांना तबलासाथ यशवंत वैष्णव करतील. 
13 मार्च 2022 रोजी संध्याकाळी सात वाजता यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन वादन होईल, त्यांना तबलासाथ मयंक बेडेकर करतील. त्यानंतर या महोत्सवाची सांगता भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांचे शिष्य व किराणा घराण्याचे अग्रणी गायक आनंद भाटे यांच्या गायनाने होणार आहे. त्यांच्या साथीला  तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर सुयोग कुंडलकर असणार आहेत.
या तीनही दिवसांसाठी तिकीटविक्री ही थिबा राजवाड्याच्या प्रांगणामध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून करण्यात येणार आहे. तसेच, आर्ट सर्कल रत्नागिरी तर्फे दरवर्षी राबवण्यात येणारी मेम्बरशिप योजना 2022 सालासाठी सुरू करण्यात आलेली असून त्यासंदर्भात अधिक चौकशीसाठी +91 94216 21217 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button